इंदापूर (प्रतिनिधी) : इंदापूर, बारामती, दौंड व बारामती लोकसभा मतदारसंघ, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पक्ष अध्यक्ष शरद पवार यांच्या विचाराचा असून, सर्वसामान्य जनतेपर्यंत विधानसभा निवडणूक कालावधीत पक्षाचे तुतारी चिन्ह पोहचवून साहेबांच्या विचाराचा पुणे जिल्हा कायम ठेवण्याचा प्रयत्न करणार असल्याची ग्वाही युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गुणवरे यांनी दिली.
इंदापूर तालुक्यातील युवक नेते अनिल शिवाजी गुणवरे यांना युवक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र बारामती येथे प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या हस्ते नुकतेच प्रदान करण्यात आले. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जिल्हा उपाध्यक्ष अनिल गुणवरे म्हणाले की, गोरगरिबांच्या समस्या, शेतकऱ्यांच्या वेदना या फक्त शरद पवार साहेबच ओळखू शकतात. सोडवू शकतात त्यामुळे समाजातील प्रत्येक घटक मनापासून पवार साहेबांच्या पाठीमागे उभा राहिला आहे. युवकांच्या भवितव्यासाठी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष वरदान ठरणार आहे.
हे युवकांनी ओळखले आहे.त्यामुळे पुणे जिल्ह्यात व राज्यात मोठ्या संख्येने युवक पक्षाकडे आकर्षित होत आहेत. पक्षाची भूमिका, आगामी ध्येयधोरणे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी काम करणार असल्याची ही माहिती जिल्हा उपाध्यक्ष गुणवरे यांनी दिली. पुणे जिल्ह्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेच्या मतदारसंघात युवकांचे संघटन मजबूत करण्यासाठी मेळावे घेतले जातील अशी माहिती पत्रकारांना जिल्हा उपाध्यक्ष अनिल गुणवरे यांनी दिली.