विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी यांची माहिती
बारामती – सध्या नागरिकीकरण मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याने विकास देखील झपाट्याने होत आहे. या पार्श्वभूमीवर सायबर क्राईम व आर्थिक गुन्ह्यांच्या तपासासाठी विविध संस्थांच्या माध्यमातून पोलिसांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
बारामती दौऱ्यावर विशेष पोलीस महानिरीक्षक फुलारी हे आले होते. बारामती तालुक्यातील बऱ्हाणपूर या ठिकाणी सुरू असलेल्या पोलीस मुख्यालयाच्या कामाची तसेच बारामती शहर पोलीस ठाण्याच्या तसेच पोलीस वसाहतीच्या कामाची पाहणी त्यांनी केली. यानंतर अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयाला त्यांनी भेट दिली.
यावेळी पोलीस अधीक्षक अंकित गोयल व अतिरिक्त पोलीस अधीक्षक आनंद भोईटे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी फुलारी यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
फुलारी म्हणाले, कोल्हापूर परिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकीकरण वाढले आहे. वाढत्या नागरिकीकरणाबरोबरच विकास देखील झपाट्याने झाला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. सध्या लोकसंख्येच्या तुलनेत पोलिसांची संख्या कमी आहे.
या पार्श्वभूमीवर नागरिकांना या विभागातील पोलीस ठाण्याच्या माध्यमातून चांगली व तात्काळ सेवा देण्याचा आमचा नेहमी प्रयत्न आहे. वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वाहतूक नियोजन करण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सहकार्याने तसेच नागरिकांच्या सहकार्याने विविध उपाय योजना केल्या जात आहेत. सायबर क्राईम व इतर गंभीर गुन्ह्यांचा तपास वेळेत होण्यासाठी पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे.
पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी बारामती शहरातील वाढत्या वाहनांच्या संख्येमुळे पार्किंग समस्या जाणवत आहे. याबाबत स्थानिक स्वराज्य संस्था व व्यापारी तसेच पोलीस अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक घेऊन नियोजन केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
काही संस्थांकडून प्रशिक्षण सुरू
फुलारी म्हणाले की, महाराष्ट्रासह इतर राज्यातील काही संस्थांच्या माध्यमातून ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने पोलिसांना प्रशिक्षण दिले जात आहे. चोरीतील मुद्देमाल जप्त करण्यासाठी पोलिसांना आधुनिक पद्धतीचे प्रशिक्षण दिले जात आहे. सायबर क्राईम हा नवीन विषय असल्याने याबाबत पोलीस कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना त्या पद्धतीचे खास प्रशिक्षण दिले जात आहे. बऱ्हाणपूर येथील पोलीस मुख्यालयाच्या कामाचे तसेच पोलीस वसाहत व बारामती शहर पोलीस ठाणे या कामांचे कौतुक फुलारी यांनी केले.