कोरेगाव भीमा -श्रीक्षेत्र वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या 334 व्या बलिदान दिनी राज्यभरातून हजारो शंभू भक्त सहभागी झाले होते. समाधीस्थळ परिसरात आकर्षक सजावट, धर्मवीर ज्योतीचे आगमन, छत्रपती संभाजी महाराजांचा जयघोष, कपाळावर भगवा टिळा, धगधगती मशाल व सळसळणारा उत्साह ओसंडून वाहत होता.
दुपारी संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली. संभाजी महाराज यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करीत त्यांच्या बलिदानाने पावन झालेल्या भूमीवर माथा टेकवत लाखो शंभूभक्त नतमस्तक झाले. यावेळी संपूर्ण परिसर शंभूमय झाला होता.
सकाळी सहा वाजता छत्रपती संभाजी महाराज यांच्या त्याग, बलिदान व शौर्याला स्मरण करून छत्रपती संभाजी महाराज यांच्यावषयी कतृज्ञता व्यक्त करीत मूक पदयात्रा काढण्यात आली. यावेळी किल्ले पुरंदर ते वढू बुद्रुक पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. आयोजक भाजपा हवेली तालुकाध्यक्ष संदीप भोंडवे व शंभू भक्त उपस्थित होते.
दुपारी 12 च्या सुमारास पाऊस आल्याने हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी उशिराने करण्यात आली. मान्यवरांच्या उपस्थितीत शंभू भक्तांनी पुष्पवृष्टी करीत धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना अभिवादन केले. पोलीस प्रशासनाच्या वतीने तीनवेळा सशस्त्र सलामी देण्यात आली. यावेळी पारंपरिक शस्त्रांची सलामी देत अभिवादन करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीने शंभू भक्तांचे स्वागत करण्यात आले. स्वच्छता, पिण्याचे पाणी, भोजन, मठ्ठा यांची व्यवस्था करण्यात आली. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मृती समिती यांच्या वतीने भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. कोरेगाव भीमा व वढू बुद्रुक येथे ग्रामपंचायतीच्या वतीने कमानी उभारल्या होत्या.
यावेळी रक्तदान शिबिरात शंभू भक्तांनी रक्तदान केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्रापूर पोलीस स्टेशनने चोख बंदोबस्त ठेवला होता. स्वराज्यरक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास आकर्षक पुष्प सजावट करण्यात आली होती. यावेळी शंभू भक्तांनी कुटुंबासह अभिवादन करीत सेल्फी घेतले.
मुख्यमंत्री गैरहजर
राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार अशोक पवार हे उपस्थित राहू शकले नाहीत. त्यामुळे शंभूभक्तांनी नाराजीचा सूर आळवला.