जेजुरी – सदानंदाचा येळकोट …येळकोट -येळकोट जयमल्हार….. असा जयघोष आणि भंडारा-खोबऱ्याची मुक्त उधळण करीत राज्याच्या विविध प्रांतातून आलेला भाविक आपली भोळीभाबडी श्रद्धा खंडेरायाच्या चरणी अर्पण करीत होता.
महाराष्ट्राचे कुलदैवत आणि बहुजन बांधवांचा लोकदेव असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत माघ पौर्णिमा यात्रेनिमित्त देवदर्शन – कुलधर्म, कुळाचारासाठी भाविकांचा महापूर लोटला होता.
रविवारी (दि.5) सुमारे दीड लाखांहून अधिक भाविकांनी गडावर दाखल होत देवदर्शन घेतले. यात्रेमध्ये विशेषतः रायगड, अलिबाग, मुंबई, वेसाव, खारदांडा येथून कोकणी बांधव परिवारासह आपल्या देव्हाऱ्यातील देव पालखीतून जेजुरीत आणत असतो. त्यांचा मुक्काम चिंचेची बाग, होळकर तलावानजिक असतो. कोकणी गीते गात, वाद्यांच्या तालात नाचत या पालख्या गडावर देवभेटीसाठी दाखल होतात.