मंचर -देशात जुन्नर वनविभागात सर्वांत जास्त बिबट्यांची संख्या आहे. यामध्ये आंबेगाव तालुक्यातील मंचर विभाग आणि शिरूर तालुक्याचा पश्चिम भाग येथे बिबट्यांची संख्या वाढली आहे, असे जुन्नर वनविभागाचे उपसंरक्षक अमोल सातपुते यांनी सांगितले. अवसरी वन (ता. आंबेगाव) येथील उद्यान्यात वनविभाग आणि पत्रकार कार्यशाळेत मार्गदर्शन करताना अमोल सातपुते बोलत होते. जुन्नर वन विभागातर्फे आंबेगाव तालुका आणि खेड तालुका पत्रकार व वनविभाग यांच्यासाठी बिबट्या या विषयावर कार्यशाळेचे आयोजन केले होते.
यावेळी मुख्य वनसंरक्षक प्रवीण एन. आर., उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक संदेश पाटील, मंचर वनपरिक्षेत्र अधिकारी स्मिता राजहंस, घोडेगाव वनपरिक्षेत्र अधिकारी महेश गारगोटे, खेड वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप रौंधळ, वन विभागाचे कर्मचारी आणि पत्रकार उपस्थित होते.
यावेळी सातपुते म्हणाले, जुन्नर वन विभागातील वाढती बिबट संख्या आणि त्यांचे वाढते हल्ले पाहता भविष्यात मानव-बिबट हा संघर्ष तीव्र होणार असून ते टाळण्यासाठी बिबट्यापासून बचाव आणि इतर माहितीची जनजागृती करण्यासाठी पत्रकारांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.
जुन्नर वन विभागातील आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात बिबट्याची मोठ्या प्रमाणावर संख्या वाढली असल्याचे निदर्शनास येत आहे. दररोज कुठे ना कुठे बिबट्यांचा हल्ल्याच्या घटना घडत आहेत. यावेळेस मुख्य वनसंरक्षक प्रवीण एन. आर., स्मिता राजहंस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
डॉ. अखिलेश ढगे यांनी चित्रफितीद्वारे बिबट्याचा जीवनपट उपस्थित पत्रकारांना उलगडून दाखवला. यात बिबट नर व मादीची वागणूक, बिबट्याच्या पाऊल खुणा, बिबट्याची हल्ला करण्याची पद्धत, मादीची प्रजनन क्षमता, त्याचा कालावधी, बिबटे बछडे, वयानुसार त्यांची वाढ, वजन, आहार याविषयी माहिती देण्यात आली.