शिरूर : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील लंघेमळ्यात सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. याठिकाणी केलेल्या खोदकामाचा अंदाज न आल्याने रविवारी (ता.४) सकाळच्या सुमारास पिकअप (एम एच १४ ई एम ५६९०) पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही हानी झाली नाही.
शिरूर तालुक्यातील अनेक गावांत जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी जलजीवन मिशन योजना राबविण्यात येत आहे. सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरू आहे. प
रंतु यासाठी ठेकेदाराने रस्त्यालगत केलेल्या खोदकामामुळे रस्त्यांची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पावसामुळे खोदकामाची माती रस्त्यावर पसरून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. यामुळे सातत्याने लहान मोठे अपघात घडत आहेत.
सविंदणे ते लोणी रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. या रस्त्याने एसटी बस, शेतमाल वाहतूक करणाऱ्या गाड्या, इ वाहनांची नेहमीच वर्दळ असते. रस्त्यालगतच खोदकाम केले असल्याने साईडपट्टयांचे नुकसान होत असून त्या खचल्या आहेत.
जलवाहिनीसाठी केलेल्या खोदकामांमुळे रस्त्याची पूर्णपणे वाट लागली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या कामाची पाहणी करून लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
“सविंदणे येथील जलजीवन मिशन योजनेच्या कामामुळे रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. अनेक दिवसांपासून रस्त्याच्या कडेला चर खोदून ठेवले आहे. संथगतीने काम सुरू असून वारंवार छोटे मोठे अपघात घडत आहेत. याला ठेकेदाराचा हलगर्जीपणा जबाबदार आहे.”
– शुभांगी पडवळ (सरपंच, सविंदणे)
“जलजीवन मिशन योजनेचे काम करत असताना, ज्या ठिकाणी चर खणून उघडे आहेत. ते तातडीने बुजविण्याच्या सुचना दिल्या आहेत. रस्त्याच्या कडेने पाईप लाईन घेण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाची परवानगी घेण्यात आली आहे. पावसामुळे सध्या काम बंद ठेवले आहे.”
– डी.डी.पवार (शाखा अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण)
“सविंदणे येथे जलजीवन मिशनचे काम सुरू असून पावसामुळे रस्त्यावर काही ठिकाणी चिखल साचला आहे. ज्या ठिकाणी साईडपट्टया व रस्ता खराब झाला आहे. ती कामे पावसाळ्यानंतर प्राधान्याने पुर्ण केली जाणार आहे.”
– सूर्यकांत कुंभार (सार्वजनिक बांधकाम विभाग)