वडापुरी -माजी उपमुख्यमंत्री अजित पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्यातील संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राने पाहिला; परंतु पुणे येथे वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगलेला विनोद व त्यानंतर दिलेल्या टाळ्यांची चर्चा मात्र इंदापूर तालुक्यात चांगलीच रंगली.
यातच भाजप व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर आपापल्या पद्धतीने अर्थ काढत व्हिडिओ व्हायरल केला. दुसरीकडे माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व हर्षवर्धन पाटील यांच्यात रंगलेल्या चर्चेचा व्हिडिओ व फोटो इंदापूर तालुक्यात मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.
ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांच्या कन्या डॉ. निवेदिता घुले यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या कार्यक्रमात माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे शेजारी बसले होते, यावेळी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. भलेही पवार व पाटील यांचे पक्ष वेगवेगळे आहेत, परंतु त्यांच्यात घडलेल्या संवादाची चर्चा मात्र इंदापूर तालुक्यात जोरात सुरू असल्याचे दिसून येत आहे.
इंदापूर तालुक्यात बारामतीचे पवार व बावड्याचे पाटील यांच्यातील राजकीय वितुष्ट संपूर्ण राज्याला माहित आहे. संधी मिळेल त्यावेळी पवार कुटुंबीयांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. राज्यात कॉंग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही अजित पवार यांच्या इच्छेनुसार इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांच्या विरोधात बंडखोरी होत गेली.
यातच 2014 साली कॉंग्रेस व राष्ट्रवादीमध्ये आघाडीत बिघाडी झाली व सरळ झालेल्या लढतीत राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भरणे यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला. 2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांचे काम करूनही विधानसभेत उमेदवारीसाठी डावल्याने माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपाचे कमळ हाती घेतले; परंतु त्यांना अल्पमताने पराभवास सामोरे जावे लागले.