आळंदी -आळंदी शहरांमध्ये शायनिंग मारत, मोकाट फिरणाऱ्या बुलेट रोडरोमियोंचा आवाज बंद कऱ्यात आला. सोमवारी सायंकाळी आळंदी-मोशी रोडवर, दिघी-आळंदी वाहतूक विभागाअंतर्गत आपल्या बुलेट बाईकला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून त्याचा कर्णकर्कश आवाज करीत तसेच रस्त्यावर वेडी वाकडी वळणे घेत बाईक चालवून व रस्त्यावरून जाणाऱ्यांना भयभीत करीत बुलेट चालवणाऱ्या सुमारे दहा दुचाकीस्वारांना दिघी आळंदी वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी चांगलाच चाप देत ताब्यात घेतले व त्यांचे सायलेन्सर काढून घेतले. शहाजी पवार यांनी केलेल्या कारवाईबद्दल आळंदीसह परिसरातील सामाजिक माध्यमांच्या माध्यमातुन वाहतूक विभागाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
आपल्या बुलेटला मॉडीफाय केलेले सायलेन्सर लावून त्याचा कर्णकर्कश आवाज करीत फिरणारे हे बुलेट रोड रोमियो यांना कायमचा चाप बसावा म्हणून ही कारवाई हाती घेण्यात आली. यापुढेही अशीच कारवाई सुरू ठेवणार असल्याचेही सांगण्यात आले. अनेकदा या रोड रोमियोंमुळे शाळा, कॉलेज, हॉस्पिटल व इतर सार्वजनिक ठिकाणी या सायलेन्सर मुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होत असून, रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना भयभीत करून त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले जाते. शिवाय याचा अनेकांना विनाकारण त्रास देखील सहन करावा लागतो.
आळंदी शहरांमध्ये व परिसरात अशा प्रकारची दहशत माजवून वाहने चालवणार असाल तर कोणाचीही गय केली जाणार नाही. शांतता व सुव्यवस्था आभाधित राहावी या दृष्टीने आम्ही पोलीस प्रशासनाच्या वतीने पाऊल उचलले आहे.
-शहाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी-दिघी वाहतूक विभाग