राजगुरूनगर – वर्षातील साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेला गुढीपाडव्याच्या सणापासून मराठी नववर्षाला सुरुवात होते. नवीन वर्षातील हा पहिलाच सण असल्याने सर्वत्र उत्साह दिसत आहे. त्यामुळे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर खेड तालुक्यात कोटींची उलाढाल होण्याची शक्यता आहे.
या दिवशी सोने व चांदीचे दागिने खरेदी करणे, वाहन, गृह खरेदी, इलेक्ट्रॉनिक्स साहित्य, लग्न सराईची खरेदी शुभ मानले जाते. त्यामुळे तालुक्यातील सराफ बाजार, वाहन बाजार, कापडबाजार फुलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. व्यापारीही जोमाने तयारीला लागले आहेत. एप्रिल आणि मे महिन्यात लग्नसराईची धामधूम राहणार आहे.
त्यामुळेही सोन्याचे दागिने खरेदीत तिप्पटीने वाढ होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. गुढीपाडव्याच्या खरेदीने विक्रीची नवी गुढी उभारली जाईल, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. सोनारांनी मोठ्या प्रमाणात दागिन्यांचा साठा करून ठेवला आहे.तर ग्राहकांकडून गर्दी टाळण्यासाठी दागिन्यांची पसंती करून ठेवली आहे.
“रेकॉर्ड ब्रेक’ विक्रीची व्यावसायिकांना आशा
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर दागिने घरी आणण्यास आतूर आहेत. सोन्याच्या दराने 60 हजारांचा आकडा पार केला आहे. तरी ग्राहकांचा सोने खरेदीचा उत्साह कायम आहे. याशिवाय वेळेवर धावपळ होऊ नये म्हणून ग्राहकांनी वाहनांचे व दागिन्यांचे बुकिंग करण्यावर भर दिला आहे.
सोने चांदीच्या भावात अलीकडे वाढ होत आहे. तरीही खरेदीसाठी गर्दी आहे. पुढील काळात सोन्याचे भाव वाढणार आहेत. गुढी पाडवा मुहूर्त, लग्न सराई असल्याने सोने खरेदीला शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांची पसंती आहे. त्यादृष्टीने विविध प्रकारची कलाकुसर, व्हरायटी असलेले सोन्या, चांदीचे दागिने वाफगाकर लक्ष्मी ज्वेलर्समध्ये विक्रीला ठेवण्यात आले आहेत.
– परेश वाफगावकर, वाफगावर लक्ष्मी ज्वेलर्स, राजगुरूनगर