लोणी काळभोर -कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीतील चौघांना लोणी काळभोर पोलीसांनी जेरबंद केले असून त्यांच्याकडून दरोड्यासाठी लागणारी हत्यारे जप्त करण्यात आली आहेत. त्यांचे दोन साथीदार अंधाराचा फायदा घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाले.
प्रेम राजू लोंढे (वय 19, रा. रेल्वे गेटजवळ आळंदी रस्ता, ता. हवेली), ऋषिकेश उत्तम लोंढे (वय 26, रा. पानमळा रस्ता, ता. हवेली), गणेश भगवान खलसे (वय 22) व तानाजी भाऊसाहेब गावडे (वय 23, दोघेही रा. माळवाडी, कुंजीरवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तपास पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे व त्यांचे सहकारी हॉटेल व लॉज चेक करणे, फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी रात्रगस्त घालत होते.
यावेळी पहाटे सव्वा दोन वाजता रात्रपाळी बीट मार्शल जी. के. आडके व ईश्वर भगत यांना माहिती मिळाली की, 7 ते 8 जण हे म्हातोबाची आळंदी रेल्वे पूलाजवळ हत्यारासह थांबले असून ते येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडवत आहेत. हे पथक तात्काळ घटनास्थळी गेले.
पोलिसांची चाहूल लागताच ते त्या ठिकाणाहून पळून जाऊ लागले; मात्र पोलिसांनी चौघांना जेरबंद केले. उर्वरीत दोघे जण अंधाराचा फायदा घेऊन तेथून पळून गेले. कुंजीरवाडी येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्यासाठी जाणार असल्याची त्यांनी कबुली दिली आहे.