बेल्हे : नगर-कल्याण महामार्गावर आळेगावाच्या नजीक लवणवाडी (ता.जुन्नर) येथे मालवाहतूक पिकअप वाहनाने दोन दुचाकींना सामोरा समोर धडक झाली. ही घटना सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघातामध्ये दुचाकीवरील दोन चिमुकल्यासह चार जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. तर ४ जण गंभीर जखमी झाले आहे.
सुनंदाबाई रोहित मधे (वय-१८ वर्ष), गौरव रोहित मधे (वय-६ वर्ष), रोहिणी रोहित मधे (वय-१८ महिने), नितीन शिवाजी मधे (वय-२२ वर्ष) सर्व राहणार पळशीवनकुटे ता. पारनेर जि. अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार त्यामध्ये चौघांचा जागीच मृत्यू झाला. तर चौघांचा पुढील उपचारासाठी नगर येथे हलवले आहे. या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी घटनेची तात्काळ माहिती पोलिसांना कळवली.
पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी येत जखमींना आळेफाटा खाजगी रुग्णालयात दाखल केले. अपघात इतका भयानक होता की, दुचाकीवरील १८ महिन्याची मुलगी रस्त्याच्या साईट खड्यात पोलिसांना मिळून आली. आळेफाटा पोलीस पुढील तपास करीत आहे.