– भाऊ ठाकूर
राहू -दौंड तालुक्यात अनेक वर्षे सोसायटी मतदारसंघावर राष्ट्रवादीचे अर्थात माजी आमदार रमेश थोरात यांचे वर्चस्व आहे. परंतु एकीकडे यामध्ये बदल होताना दिसत आहे. निवडणूक झालेल्या सोसायट्यांमध्ये सरासरीने आमदार राहुल कुल यांच्या समर्थक सोसायट्यांमध्ये वाढ होत आहे. काहीअंशी परिणाम मागील वर्षी जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत दिसून आला होता. अनेक संस्था कुल गटाच्या ताब्यात गेल्याने सोसायटी मतदारसंघात राष्ट्रवादीला आत्मचिंतनाची गरज आहे.
दौंड तालुक्यात यंदा भाजप व राष्ट्रवादी अशी सरळ सरळ लढत दिसत होती. वरिष्ठ पातळीवरून अनेक गोष्टी घडल्या. भारतीय जनता पार्टीचे दौंड तालुका मतदारसंघातील अ वर्गातील अभिमन्यू गिरमकर व एनटी प्रवर्गातील सुखदेव चोरमले यांनी माघार घेतल्यामुळे दौंडचे अ प्रवर्गातील माजी आमदार थोरात व एनटी प्रवर्गातील राष्ट्रवादीचे बारामतीचे दत्तात्रय येळे हे जिल्ह्यातून बिनविरोध आले होते. अजित पवार यांनी आम्हाला विनंती केल्यामुळे आम्ही अर्ज मागे घेतला आहे, असे भाजपाचे तालुकाध्यक्ष माऊली ताकवणे यांनी सांगितले होते.
त्यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीदेखील मी दौंड व जुन्नरमध्ये बिनविरोधसाठी बॅंकेसंदर्भात काही शब्द दिले आहेत. ते मी पाळणार आहे. त्यात बिनविरोध निवडून येणाऱ्यांनी लुडबूड करू नये, असे वक्तव्य केले होते. त्यावेळी वक्तव्याची बरीच चर्चा झाली होती. मागील दोन दिवसांपूर्वी झालेल्या सोसायटी निवडणुकातदेखील आमदार कुल गटाचेच वर्चस्व राहिले आहे. सात निवडणुकांपैकी पाच सोसायट्या या आमदार गटाकडे आल्या आहेत, तर दोन माजी आमदार गटाकडे गेल्या आहेत.
यामध्ये वडगाव बांडे, पाटेठाण, तांबेवाडी, खोपोडी, लोणारवाडी या आमदार गटाकडे तर लडकतवाडी, माटोबा या संस्था माजी आमदार गटाकडे गेल्या आहेत. सोसायट्यांच्या निवडणुकांमुळे त्यात चांगलीच भर पडलेली आहे. परंतु स्थानिक पातळीवर आमदार गटावर त्याचा जास्त परिणाम झालेला दिसून येत नाही.
जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीवर परिणाम?
दौंड तालुक्यात सहकार क्षेत्रावर माजी आमदार रमेश थोरात यांची एकहाती सत्ता आहे. त्यामुळे गेल्या 25 वर्षांत थोरात यांनी सहकाराचे जाळे विस्तृत केले आहे. त्याचा फायदा हा राष्ट्रवादीला होत आला आहे. यात आमदार कुल यांची पीछेहाट होत होती. जिल्हा बॅंक, कात्रज दूध संघ आदी सहकारातील संस्थांवर राष्ट्रवादीची पकड मजबूत आहे. मात्र, यावेळी आमदार कुलांच्या ताब्यात सोसायट्या गेल्याने जिल्हा बॅंकेच्या आगामी निवडणुकीत चुरस होणार आहे, याचे संकेत मिळत आहेत.