सविंदणे -सविंदणे (ता. शिरूर) येथील लंघेमळा येथे पंढरीनाथ धोंडीबा लंघे या शेतकऱ्याच्या उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी करताना बिबट्याचे 4 बछडे आढळून आले आहेत. (दि.19) उसाच्या शेतामध्ये ऊस तोडणी मजुरांवर बिबट्या धावून आल्याची घटना घडली होती. ही घटना ताजी असतानाच बछडे आढळल्याने खळबळ उडाली आहे.
बिबट्याने हल्ला केल्यानंतर प्रसंगावधान राखून मजुरांनी आरडाओरडा केला. तेथून पळ काढला. यामध्ये एका महिला मजुराच्या डोळ्याला जखम झाली आहे. ऊस तोडणी मजूर थोडक्यात बचावले आहेत. याबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळताच वन अधिकारी ऋषिकेश लाड, वन कर्मचारी हनुमंत कारकुड,
सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन तात्काळ पिंजरा लावला होता. पिंजऱ्यात बिबट्या मात्र जेरबंद झाला नाही. ऊस तोडणी करताना बिबट्याचे 4 बछडे आढळले आहेत. वनविभागाने बछड्यांना सुरक्षित पिंजऱ्यात ठेवण्यात आले आहे. बछड्यांना बिबट मादीच्या स्वाधीन केले जाणार आहे. अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
दरम्यान, सविंदणे परिसरात बिबट्याची दहशत मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेकवेळा बिबट्याच्या हल्ल्यात पशुधनाचा मृत्यू झाला आहे. दिवसा शेतामध्ये काम करताना शेतकऱ्यांना बिबट्याचे दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.