जेजुरी -जेजुरी शहरात शुक्रवारी (दि. 24) सायंकाळच्या सुमारास दोन गटांतील धुमश्चक्रीमध्ये कोयता-तलवारी, दगडांचा वापर झाला होता. या घटनेच्या वेळी परिसरातील दुकाने बंद झाली होती. दरम्यान, या घटनेमुळे अद्यापही सर्वसामान्य नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण असल्याने शहरात कायदा व सुवस्था आबाधित राखण्याचे आव्हान जेजुरी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे.
जेजुरी नगरपालिकेसमोर कोयता व तलवारीने वार करून पाच जणांना गंभीर जखमी केलेल्या पाचजणांवर शुक्रवारी (दि. 24) रात्री उशीरा जेजुरी पोलिसांनी ऑट्रासिटीसह विविध अन्वये गुन्हा दाखल केला आहे. नारायण वामन जाधव, ओंकार नारायण जाधव, मंगलेश नारायण जाधव, विपुल मोरे, योगेश हरणावळ (सर्व रा. जेजुरी, ता. पुरंदर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याची नावे असून यातील ओंकार जाधव व मंगलेश जाधव या दोघांना पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
याप्रकरणी गौतम भीमराव भालेराव यांनी फिर्याद दिली आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमेश तावसकर हे पुढील तपास करीत आहेत. दरम्यान, पोलिसांनी जेजुरी शहरात असणाऱ्या अवैध व्यवसायांना आळा घालत त्यांच्याविरोधात कठोर भूमिका घ्यावी, अशी मागणी जोर धरीत आहे.