सासवड, -सहकार महर्षी स्व. चंदूकाका जगताप यांच्या पाचव्या पुण्यसमरणानिमित्त सासवड येथील संत सोपानकाका महाराज संजीवन समाधी मंदिराच्या प्रांगणात रविवारी (दि. 29) व सोमवारी (दि. 30) भजन स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
सासवड सांस्कृतिक मंडळ सासवड आणि बोपगाव भजनी मंडळ यांच्या संयुतक विद्यमाने खुला आणि लहान गटात या स्पर्धा होणार असल्याचे मंडळाचे सचिव रवींद्रपंत जगताप यांनी सांगितले. पुरंदर-हवेली मतदारसंघातील गावागावांतील भजनी मंडळांनी या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. खुल्या आणि लहान गटातील प्रथम पाच विजेत्या संघांना प्रत्येकी अनुक्रमे 11, 9, 7, 5 आणि 3 हजार रुपयांची रक्कम,
तसेच ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धिनी जगताप यांच्या वतीने सन्मानचिन्ह, तसेच सहभागी सर्व भजनी मंडळांना सतरंजी भेट देण्यात येणार आहे. रविवारी (दि. 29) सकाळी स्पर्धांचे उद्घाटन व संध्याकाळी शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम होणार आहे. सोमवारी (दि. 30) सायंकाळी बक्षीस वितरण होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पुरंदरमधील बोपगाव भजनी मंडळ तसेच सासवड येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व संस्थेच्या सर्व शाखा तसेच श्रीनाथ झेरॉक्स, माधुरी मेडिकल आणि संजीवन डेअरी येथे संपर्क साधण्याचे आवाहन आमदार संजय जगताप तसेच सासवड सांस्कृतिक मंडळ आणि बोपगाव भजनी मंडळ यांनी केले आहे.