वाघोली : वाघोलीमध्ये विधानसभा निवडणुकीत एकूण ५८.२० टक्के मतदान झाले असून एकूण ६८००५ मतदारांपैकी ३९५८३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याची माहिती मिळत आहे. मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वाघोलीत ५६.९५ टक्के मतदान झाले होते. यावेळी मतदारांचा उत्साह चांगलाच दिसून आल्याने १.२५ टक्के जास्त मतदान यावेळी झाले आहे.
वाघोलीत मतदान करण्यासाठी मतदारांचा दिवसभर उत्साह जाणवला. मतदानाला सकाळी सुरुवात झाल्यापासून दुपारपर्यंत नागरिकांनी मतदान करण्यासाठी रांगा लावल्याचे दिसून आले. सायंकाळी मतदानाचा कालावधी संपेपर्यंत मतदार मतदानासाठी येत होते. सकाळी पोलिंग बूथ मध्ये पोलिंग एजंटला धमकावल्याप्रकारणी गोंधळ झाला होता तर बोगस मतदान केले जात असल्याचा आरोप करण्यात आला.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा वाघोलीत यावेळी विधानसभेला मतदान अधिक झाले आहे. शिरूर विधानसभेत एकूण ५८.९० टक्के मतदान झाले आहे. वाघोलीत वयोवृद्धांपासून तरुणांपर्यंत तसेच प्रथमच मतदान करणाऱ्या मतदारांमध्ये व उत्साह होता. पोलिसांच्या चोख बंदोबस्तात मतदान शांततेत पार पडले आहे. मतदान केंद्राच्या परिसरात मोबाईल वापराबाबत प्रशासनाने कडक भूमिका घेतली होती.
वाघोलीतील मतदान केंद्रांवर सकाळी गोंधळाचे वातावरण झाले असल्याने पोलिसांनी १०० मीटरच्या परिसरामध्ये चोख बंदोबस्त लावला होता. मतदाराचे वास्तव्य असलेल्या ठिकाणापासून मतदान केंद्र लांब असल्याने काहीसा हिरमोड झाला असल्याचे दिसून येत असतानाही मतदारांनी मतदान केंद्र गाठून मतदान केले.
तरुण, वृद्ध, दिव्यांग, महिला मतदारांचा असणारा उत्साह, मतदानाची वाढलेली टक्केवारी, स्थानिक ग्रामस्थांचे झालेले मतदान, सोसायटी मधील बाहेर पडलेला मतदार यावरून कोण बाजी मारणार यावर ठिकठिकाणी चर्चाही रंगली होती. वाघोलीत सर्वाधिक चुरस महायुतीचे माऊली कटके व महाविकास आघाडीचे अशोक पवार यांच्यात प्रमुख लढत आहे.