पुणे : ‘पोलीस २४ तास काम करतात. त्यांना चांगल्या सुविधा दिल्या तर ते नागरिकांना न्याय देतील. पोलिसंना चांगल्या सुविधा देण्यासाठी शासन कटीबद्ध असून, पोलिसांनी सामान्यांना द्यावा’, अशा सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या.
पुणे पोलिसांकडून पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी ‘तरंग’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन शिवाजीनगर पोलीस मुख्यालयाच्या मैदानात करण्यात आले. या वेळी प्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल यांनी विविध गीते सादर करुन उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत हाेते. उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय नागरी हवाई वाहतूक, सहकार मंत्री मुरलीधर मोहोळ, नगरविकास विकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, पुनीत बालन ग्रुपचे संचालक पुनीत बालन, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त आयुक्त शैलेश बलकवडे, प्रवीणकुमार पाटील, अरविंद चावरिया या वेळी उपस्थित होते. या वेळी फडणवीस यांच्या हस्ते पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, संदीपसिंग गिल, संदीप भाजीभाकरे, तसेच पोलीस दलात चांगली कामगारी करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात फडणवीस यांच्या हस्ते ‘काॅप २४’ या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
फडणवीस म्हणाले, ‘ पुणे शहर आंतराष्ट्रीय पातळीवरील महत्वाचे शहर आहे. विविध देशातील नागरिक शहरात येतात. शहरातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांंकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना राज्यशासनाकडून पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. गंभीर गुन्हे रोखण्यासाठी पोलिसांनी ‘काॅप २४’ ही योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत शहरात २४ तास गस्त घालण्यात येणार असून, पोलिसांना वाहने उपलब्ध करून देण्यात आली आहे. पोलिसांना चांगल्या सुविधा दिल्या तर ते नागरिकांना न्याय देतील.’
पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही : पवार
राज्य शासन हे सातत्याने पोलिसांच्या मागे उभे आहे. पुणेकरांना त्रास होणार नाही याची काळजी पोलिसांनी घ्यावी. पोलिसांना कोणत्याही पायाभूत सुविधा कमी पडू देणार नाही, असे अश्वासन पवार यांनी दिले. एका सराफ पेढीतून चोरीला गेलेले सोने या कार्यक्रमात सराफ व्यवसायिकाला परत करण्यात आले. त्याचा संदर्भ जोडत पवार म्हणाले, एकदा चोरीला गेलेले सोने सापडून दिले आहे. यापुढे आपले सोने चोरीला जाणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी