पिंपरी! सायबर गुन्हेगारांच्या मदतीला “गुगलबाबा’

* चुकीच्या माहितीमुळे अनेकांना चोरट्यांचा गंडा *आर्थिक व्यवहार करताना सावध राहण्याचे पोलिसांचे आवाहन

पिंपरी: आपल्याला कोणतीही माहिती हवी असल्यास अनेकजण गुगलवरील माहितीचा आधार घेतात. मात्र, याचाच गैरफायदा चोरटे घेत आहेत. गुगलवरील महितीमधील मोबाइल क्रमांक ते बदलतात. त्या क्रमांकावर नागरिकांनी संपर्क केल्यास सायबर गुन्हेगार त्यांना गंडा घालतात.

डिजिटल पेमेंटला प्राधान्य द्या, असे आवाहन केंद्र सरकारने केले.त्यानुसार अनेकांनी ऑनलाइन व्यवहार सुरू केले. यामुळे सायबर गुन्हेगारही सक्रिय झाले व त्यांनी नागरिकांची फसवणूक करण्यास सुरवात केली. गुगलवर असलेले क्रमांक कसे बदलतात याची माहिती सायबर गुन्हेगारांना असल्याने ते गैरफायदा घेतात.

नागरिकही गूगलवरील माहितीची खातरजमा न करता आर्थिक व्यवहार करतात. सायबर गुन्हेगार इतर राज्यांतून नागरिकांची ऑनलाइन फसवणूक करतात. अशा गुन्हेगारांना अटक करण्याचे मोठे आवाहन सायबर पोलिसांसमोर असते. यामुळे आर्थिक व्यवहार करताना नागरिकांची खात्री करावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.

घटना 1
पिंपळे गुरव परिसरातील एका गृहिणीला गॅसची आवश्‍यकता असल्याने “गुगल’वर जवळच्या गॅस वितरकाचा पत्ता मिळवला. त्यावर असलेल्या क्रमांकावर तिने संपर्क साधला. त्यावरील फोनवरील व्यक्‍तीने सुरवातीला फॉर्म भरण्यास सांगून त्यानुसार पाच रुपये महिलेला ऑनलाइन पाठवण्यास सांगितले. महिलेने फॉर्म भरून पाच रुपये ऑनलाइन ट्रान्सफर केले. मात्र, काही वेळेतच महिलेच्या खात्यावरून हजारो रुपये चोरीस गेले. त्यानंतर त्या महिलेने गुगलवर मिळालेल्या त्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला, असता तो बंद असल्याचे दिसून आले.

घटना 2
लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने बंद असल्याने ऑनलाइन दारू मिळते का, याची चाचपणी अनेकजण करतात. दोन दिवसांपूर्वी एका नागरिकाने आपल्या घराजवळील दारूच्या दुकानाची माहिती “गूगल’वर पाहिली. त्यावर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधला. त्यावेळी फोनवरील समोरील व्यक्‍तीने पैसे ऑनलाइन पाठविण्यास सांगितले. मात्र पैसे मिळालेच नाहीत, असे सांगून पुन्हा पैसे पाठविण्यास सांगितले. तुमचे पैसे आम्हाला मिळाले नाहीत, त्यामुळे ते परत काही वेळाने तुमच्या खात्यात परत येईल. दोनदा पैसे पाठवूनही संबंधित व्यक्‍तीला दारू मिळालीच नाही. यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्या व्यक्‍तीने ऑनलाइन तक्रार नोंदविली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.