दुकाने सुरू, पण व्यवसाय 30 टक्क्यांवर
करोनाच्या तडाख्यानंतर सरकारी मदतीची अपेक्षा
पुणे – करोना परिस्थितीचा जबर फटका सराफ व्यवसायालाही बसला आहे. नेहमीच्या तुलनेत सध्या केवळ 30 टक्केच व्यवसाय होत आहे. आता व्यवसाय वाढीस तीन ते चार महिने लागण्याची शक्यता आहे. मात्र, तोपर्यंत सराफ व्यावसायिकांना सरकारकडून मदतीची अपेक्षा आहे.
करोनाच्या पहिल्या लाटेनंतर केवळ 20 टक्केच विक्री होत होती. दुकाने सुरू झाल्यानंतर त्यात वाढ झाली. व्यवसाय आता जोर धरेल, असे वाटत असताना करोनाची दुसरी लाट आली. पुन्हा निर्बंध लागले. सुमारे दोन महिने दुकाने बंद होती. त्यामध्ये गुढीपाडवा, अक्षय तृतीया असे मुहूर्त निघून गेले. त्यामुळे सोने खरेदी झालीच नाही. पण, आता अनलॉक प्रक्रिया सुरू झाली आहे.
सुरुवातीला दुपारी चार वाजेपर्यंत, आता सायंकाळी सात वाजेपर्यंत सराफी दुकाने सुरू असतील. पण आता दुकाने सुरू झाली, तरी अपेक्षित ग्राहक नाहीत. कारण लॉकडाऊनमुळे व्यावसायिक, नोकरदारांना आर्थिक समस्येला सामोरे जावे लागत आहे. जवळ गंगाजळी नसल्याने सोने खरेदी घटली आहे. मात्र, भारतात सोन्याला खूप महत्त्व आहे.
धार्मिक भावना जोडल्या आहेत. लग्नासह विविध शुभ कार्यांत आवर्जून सोने खरेदी केली जाते. अलीकडे गुंतवणूक म्हणून सोने खरेदी करण्यात लक्षणीय वाढ झाली आहे. येत्या तीन-चार महिन्यांत ही परिस्थिती बदलेल, तोपर्यंत सरकारने सराफी व्यावसायिकाला मदत करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
करोना काळात जितकी दिवस दुकाने बंद होती, तितके दिवस वीजबिल माफ व्हावे. आम्हाला कामगारांना पगार द्यावा लागत आहे. या काळात ईएसआय, ईपीएफची रक्कम भरण्यास सरकारने मदत केली पाहिजे. अनेक व्यावसायिकांनी कर्जे घेतली आहेत. व्यवसाय सुरू नसल्याने ते हप्ते भरू शकले नाहीत. त्यांना बॅंकांचे हप्ते भरण्यास सवलत दिली पाहिजे.
– फत्तेचंद रांका, अध्यक्ष, पुणे सराफ असोसिएशन.
लस उपलब्ध करून दिल्यास विकत घेऊ
शहरातील सराफा दुकानात काम करणाऱ्या कामगारांचे करोना प्रतिबंधक लसीकरण करणे गरजेचे आहे. यासाठी 15 हजार लसी उपलब्ध करून देण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. सरकारने प्राधान्याने या लसी उपलब्ध करून दिल्या पाहिजेत. या लसी आम्ही फुकट नाही, विकत मागत आहोत. मात्र, सरकारने लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या पाहिजेत, अशी भूमिका रांका यांनी मांडली.