भाजपसाठी पुणे सोन्याचे अंडी देणारी कोंबडी

आमदार गाडगीळ : मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर प्रत्युत्तर

पुणे – भाजपने शहरासाठी गेल्या पाच वर्षांत काहीच केले नाही. त्यामुळेच कॉंग्रेस-राष्ट्रवादीवर आरोप करणाऱ्या भाजपकडून पुण्याला सोन्याचे अंडी देणारी कोंबडी म्हणून पाहिले जात आहे, असा पलटवार कॉंग्रेसचे प्रवक्ते आणि आमदार अनंत गाडगीळ यांनी बुधवारी करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.

गाडगीळ म्हणाले, “शहरात पाणी कपात सुरू असून शहराचा पाणी प्रश्‍न, कचरा, वाहतूक समस्या, वाढते प्रदूषण, नदीची झालेली दुरावस्था यातील कोणताही प्रश्‍न भाजपला सोडविता आला नाही. या उलट मेट्रो, रिंगरोड या प्रकल्पांची सुरूवात आम्ही केली. मात्र, ते श्रेय घेत आहेत. असे असेल तर पुण्याची मेट्रो आधी मंजूर होऊनही आवश्‍यकता नसताना नागपूर मेट्रोचे काम आधी का सुरू झाले, याचे उत्तर भाजपने द्यावे, पुण्याची मेट्रो रखडण्यामागे पालकमंत्री आणि खासदार यांच्यातील वाद कारणीभूत होता, तर पाण्यासाठी पुणेकरांना वनवण करावी लागण्यामागे पालकमंत्री आणि जलसंपदामंत्र्यात सुरू असलेला वाद कारणीभूत असल्याची टीका गाडगीळ यांनी केली.

मागील लोकसभा निवडणुकीत स्मार्ट सिटीच्या नावाखाली शहराच्या विकासाचे चित्र निर्माण करून भाजपचा 1 खासदार, 8 आमदार तसेच 100 हून अधिक नगरसेवक निवडून आले. मात्र, त्या नंतर शहराचा विकास होण्याऐवजी भ्रष्टाचार आणि ठराविक ठेकेदरांसाठीच कामे सुरू असल्याचे समोर आले आहे. त्याचे मुख्य उदाहरण म्हणजे, समान पाणी पुरवठा योजना, तसेच रखडलेला स्मार्ट सिटी प्रकल्प आहे. त्यामुळे आता भाजपने गेल्या पाच वर्षांत शहरासाठी काही केले असेल, तर निवडणूक प्रचारातून दाखवून द्यावे असे आवाहनही गाडगीळ यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)