खडकवासला – निर्बंध शिथिल झाले असले तरी शनिवार आणि रविवार “वीकेंड’चे कडक निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. परंतु, विकेंडच्याच दिवशी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडत असून पर्यटन स्थळांवर गर्दी करीत आहेत. अशा गर्दीतूनच शहरातील करोना बाधीतांची संख्या वाढू लागल्याने पर्यटन स्थळी गर्दी करणाऱ्यांवर जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार पोलिसांकडून दंडात्मक कारवाई केली जात आहे.
करोना संसर्गाचा धोका ओळखून प्रशासनाने प्रतिबंधात्मक आदेश लागू केले असून खडकवासला, सिंहगड, पानशेत परिसरात पर्यटकांची गर्दी रोखण्यासाठी हवेली पोलिसांनी कडक बंदोबस्त तैनात केला आहे. पोलिसांनी केलेल्या कारवाईत 137 जणांवर कारवाई करून 68 हजार दंड वसूल करण्यात आला.
करोना संसर्गाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून पर्यटन स्थळांवर होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. प्रतिबंधात्मक क्षेत्राच्या एक किलोमीटर परिसरात पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास मनाई करण्यात आली आहे. खडकवासला धरण परिसरात पुणे ग्रामीण पोलिसांनी 137 जणांवर कारवाई करत 68 हजारांचा दंड वसूल केला. या कारवाईत पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार, पोलीस निरीक्षक सहायक पोलीस निरीक्षक निरंजन ननावरे, पोलीस फौजदार प्रदीप नांदे, पोलीस उपनिरिक्षक ऋतुजा मोहिते, पोलीस हवालदार रामदास बाबर यांच्यासह 16 पोलीस कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान सहभागी झाले आहेत.