पुणे – परवानगी घेऊनच स्मार्ट सिटी बैठकीला जा; अधिकाऱ्यांना आयुक्‍तांची तंबी

पुणे – पुणे स्मार्ट सिटीच्या कोणत्याही बैठकांना जाताना या पुढे प्रत्येक संबंधित विभागाने महापालिका आयुक्‍तांची परवानगीही घ्यावी, तसेच बैठकीचा अहवाल सादर करावा, अशी तंबीच आयुक्‍त सौरभ राव यांनी सर्व विभाग प्रमुखांना दिली आहे. याबाबतचे लेखी आदेशच काढले असून त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पुणे स्मार्ट सिटीकडून बाणेर-बालेवाडी भागाची एरिया डेव्हल्पमेंटसाठी निवड झाली आहे. या भागात स्मार्ट सिटीकडून नेमण्यात आलेल्या कंपनीकडून रस्ते, सेवा क्षेत्र, तसेच नागरिकांना अत्याधुनिक सेवासुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. या कामांसाठी स्मार्ट सिटीला देण्यात आलेल्या जागा महापालिकेच्या मालकीच्या असून पथ विभाग, उद्यान विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभाग, शिक्षण विभाग, संगणक विभागासह विद्युत विभाग आणि वाहतूक नियोजन विभागाच्या माध्यमातून या भागासाठी तसेच संपूर्ण शहरासाठी संयुक्‍त स्वरुपात प्रकल्प राबविले जात आहेत. त्यामुळे या प्रकल्पांच्या नियमित बैठका स्मार्ट सिटीच्या कार्यालयात होतात. त्याला पालिका विभागांचे अधिकारी उपस्थित असतात.

मात्र, अनेकदा बैठकीची कोणतीही कल्पना या अधिकाऱ्यांकडून आयुक्‍तांना दिली जात नाही, तसेच बैठकीत काय निर्णय झाले, त्याचा अहवाल अथवा कसलीही माहिती दिली जात नाही. त्यामुळे आयुक्‍तांनी फेब्रुवारी-2019 मध्ये कार्यालयीन आदेश काढून या पुढे होणाऱ्या सर्व बैठकांचा अहवाल सादर करण्याच्या सूचना विभाग प्रमुखांना दिल्या होत्या. मात्र, गेल्या तीन महिन्यांत सुमारे 10 ते 12 बैठका झाल्यानंतरही कोणत्याही विभागाने अहवाल सादर केलेला नाही. तसेच, बैठकीची कल्पनाही आयुक्‍तांना दिलेली नाही. त्यामुळे प्रशासकीय कामकाजात शिस्त आणण्यासाठी आयुक्‍तांनी हे आदेश काढले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.