पुणे – टॅंकरमधील पाणी निर्जंतुक करूनच द्या

विभागीय आयुक्‍त : चारा छावणी, पाणी टंचाईची पाहणी

पुणे – टॅंकर मागणीचा प्रस्ताव आल्यानंतर त्यावर तत्काळ कार्यवाही करावी. टॅंकर भरण्याच्या ठिकाणी पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी चांगल्या दर्जाचे ब्लिचिंग पावडर पुरेशा प्रमाणात ठेवावे आणि प्रत्येक खेपेच्या वेळी पाणी पूर्णपणे निर्जंतुक झाल्याची चाचणी घ्यावी. यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पथक नेमावे, अशा सूचना विभागीय आयुक्‍त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.

राज्यात झालेला अल्प पाऊस, त्यामुळे उपलब्ध पाण्याची कमतरता आणि सध्याच्या प्रखर उन्हामुळे राज्यात टंचाई परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक धरणांतील पाण्याची पातळी कमी झाली आहे. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी पाणी टंचाई भेडसावत आहे. यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत.

याविषयी डॉ. म्हैसेकर म्हणाले, “विभागातील 58 पैकी 26 तालुक्‍यांमध्ये पूर्णत: तर 21 तालुक्‍यांत अंशत: दुष्काळ जाहीर केलेला आहे. विभागातील एकूण 6 हजार 735 महसुली गावांपैकी 3 हजार 863 गावे दुष्काळाने बाधित आहेत. पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांमधील गावांमध्ये व त्यामधील वाड्या-वस्त्यांमध्ये टंचाई परिस्थिती आहे.

सोलापूरच्या सांगोला, मंगळवेढा, करमाळा, बार्शीसह अन्य तालुके, सातारा जिल्ह्यातील माण, खटाव, कोरगांव, फलटणसह काही भाग तर, सांगली जिल्ह्यातील जत, आटपाडी, तासगांव, कवठेमहांकाळ, खानापूर, पुणे जिल्ह्यातील इंदापूर, बारामती, शिरुर, पुरंदर या तालुक्‍यांत टंचाई अधिक प्रमाणात आहे. चारा छावण्यांच्या ठिकाणी शेड, विद्युत व्यवस्था व अग्निशमन यंत्रणा असल्याची पाहणी केली. तसेच चारा छावणीत दाखल झालेल्या सर्व पशुधनाचे लसीकरण करुन पशुखाद्याच्या गुणवत्तेची तपासणी करावी, पशुपालक समितीची नियमीत बैठक घेण्यात यावी, आजारी जनावरांची स्वतंत्र व्यवस्था ठेवावी, चारा छावण्यांचे संचालन काटेकोरपणे करावे, अशा सूचना जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत.’

विविध कामे सुरू
विभागात 1 ऑक्‍टोबर 2018 ते 30 जून 2019 कालावधीसाठी 82 कोटी 64 लाख रुपयांचा टंचाई निवारण कृति आराखडा तयार करण्यात आला आहे. या अंतर्गत नवीन विंधन विहिरी घेणे तसेच दुरुस्ती करणे, नळ, पाणी पुरवठा योजनांची विशेष दुरुस्ती, नवीन नळ योजना करणे, टॅंकरने पाणीपुरवठा करणे, विहिरींचे अधिग्रहण करुन गाळ काढणे अशी कामे करण्यात येत आहेत.

दुष्काळी भागातील नागरिकांसाठी सुविधा
– जमीन महसुलात सूट
– सहकारी कर्जाचे पुनर्गठन
– शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीस स्थिती
– कृषी पंपाच्या चालू वीजबिलात 33.5 टक्के सूट
– रोहयो अंतर्गत कामाच्या निकषांत काही प्रमाणात शिथिलता
– शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ

Leave A Reply

Your email address will not be published.