पुणे- पक्षात महत्त्वाच्या पदावर तरुणांना संधी द्या; पक्षात तरुण कार्यकर्ते दिसले पाहिजेत. पक्षाचा विचार तरुण हवा, कृती तरुण हवी, दिसणे आणि जिंकणेही तरुणांसारखेच असले पाहिजे, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी शुक्रवारी व्यक्त केले.
चिंदबरम यांनी कॉंग्रेसभवनमध्ये सदिच्छा भेट दिली. त्यावेळी कार्यकर्त्यांशी ते बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे, माजी आमदार उल्हास पवार, मोहन जोशी, ऍड. अभय छाजेड आदी उपस्थित होते.
पक्षबांधणीसाठी आपल्याला ब्रिगेडियर, मेजर जनरल्स, कर्नल्स वगैरे नको आहेत आपल्याला लढणारे सैनिक (फुट सोल्जर्स) हवे आहेत; त्यांच्यामुळेच युद्ध जिंकता येते. त्यामुळे त्यांना घेऊन पक्षाची पुनर्बांधणी करा, असा सला चिदंबरम यांनी दिला.
कॉंग्रेस पक्षाचे 2.3 कोटी सदस्य आहेत. बुथकमिटी मेंबर म्हणून निवडून आलेला एकेक पायरी पुढे जातो. वॉर्ड कमिटी, ब्लॉक कमिटी जिल्हा कमिटी आणि त्यानंतर राज्याच्या, शेवटी देशाच्या कमिटीमध्ये पोहोचतो. तरुणांना या कमिट्यांमध्ये सहभागी करून घ्या. आपण वरिष्ठ आहोत, हुशार आहोत ही भावना बाजूला ठेवा. तरुण पिढीही हुशार आणि क्षमता असलेली आहे. त्यांच्यातील अनेकजण जबाबदारी घेऊ शकतात, असेही चिदंबरम यांनी नमूद केले.
भारताच्या एकूण लोकसंख्येच्या 50 टक्के लोकसंख्या ही 25 वर्षे वयाच्या आतील तर 60 टक्के लोकसंख्या ही 35 वर्षे वयाच्या आतील आहे. आताच्या पिढीला जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी माहित नाहीत. सध्याच्या तरुणपिढीच्या जन्माच्या आधीच ते गेले आहेत. आताच्या सरकारने या सगळ्यांची नावे पाठ्यपुस्तकातूनही काढून टाकली आहे. त्यामुळे या नेत्यांविषयी या नव्या पिढीला सांगा. या तरुण पिढीला कार्यात आणा. त्यांनी पक्षकार्याची जबाबदारी घेतली पाहिजे, असा सल्ला चिदंबरम यांनी दिला.