पुणे – “पीजी’च्या विद्यार्थी डॉक्टरांना शुल्कमाफी द्याराज्यात करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यापासून वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे राज्यातील सर्वच निवासी विद्यार्थी डॉक्टर्स करोना बाधितांना उपचारसेवा देण्यात गुंतले आहेत. त्यामुळे मागील 14 महिन्यांत शिक्षण, प्रशिक्षणसेवा बंद असली तरी सरकारी मेडिकल कॉलेजकडून शुल्क भरण्यासाठी तगादा सुरू आहे. परिणामी, वैद्यकीय शाखेच्या “पीजी’च्या विद्यार्थी डॉक्टरांना शुल्क माफी द्यावी, अशी मागणी बी. जे. मेडिकल कॉलेजच्या “मार्ड’ या निवासी डॉक्टरांच्या संघटनेने केली आहे.
सरकारी मेडिकल कॉलेजमधील निवासी डॉक्टर्स हे त्यांच्या स्पेशलायझेशन विषयांचे ज्ञान सोडून महामारीच्या आपत्तीविरुद्धच्या लढ्यात अहोरात्र रुग्णसेवा देत आहेत. या लढ्यात विद्यार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकारी मेडिकल कॉलेजकडून कानाडोळा करण्याबाबत “मार्ड’ने खंत व्यक्त केली आहे. कामाचा अतिरिक्त ताण सहन करताना रुग्णसेवा देणाऱ्या निवासी विद्यार्थ्यांचे मानसिक खच्चीकरण होत आहे. राज्य सरकारच्या नकारात्मक धोरणामुळे राज्यभर निवासी डॉक्टर्समध्ये निराशा पसरल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे.
“गेल्या 14 महिन्यांपासून आमचे शिक्षण आणि प्रशिक्षण बंद आहे. बी. जे.मेडिकल कॉलेज तसेच सरकारी रुग्णालयांतील ही स्थिती आहे. करोनाच्या आपत्तीमध्ये निवासी डॉक्टर्स रुग्णसेवा देत असतानाही शैक्षणिक शुल्क मागण्यात येत आहे. सर्व निवासी वैद्यकीय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वर्षे मागील दोन वर्षांतील शिक्षण तसेच सरावच न मिळाल्यामुळे विद्यापीठाचे असलेले शैक्षणिक शुल्क माफ करावे अशी मागणी करण्यात आली आहे,’ अशी माहिती संघटनेचे सचिव डॉ. ज्ञानेश्वर जामकर यांनी दिली.
===============