पुणे – गिरीश बापट यांनी संधी वाया घालवली – मोहन जोशी

पुणे – “गिरीश बापट यांना पाच वर्षे पालकमंत्री पदाची संधी मिळाली होती; त्यावर ते पुण्याचा भरीव विकास करतील अशी अपेक्षा होती. परंतु ती अपेक्षा फोल ठरली असून, त्यांनी ती संधी वाया घालवल्याची’ टीका आघाडीचे उमेदवार मोहन जोशी यांनी केली.

वडगाव शेरी विधानसभा मतदार संघात सोमवारी आयोजित प्रचार फेरीत ते बोलत होते. मेट्रो मार्गी लावली म्हणून प्रत्येक सभेत ते पाठ थोपटून घेत असले तरी पुण्याच्या मेट्रोला भाजप सरकारने तीन वर्षे उशीर लावला त्यामुळे या प्रकल्पाचा खर्च किमान अडीच ते तीन हजार कोटींनी वाढला. भाजपच्या या बेफिकिरीचा बोजा पुणेकरांनाच सोसावा लागणार असल्याचे जोशी म्हणाले.

रॅलीची सुरूवात शिवाजी पुतळा येथून झाली. साईबाबा मंदिर येथे समाप्त झाली. यामध्ये माजी आमदार बापूसाहेब पठारे, सुनील टिंगरे, सुमन पठारे, भय्यासाहेब जाधव, महेंद्र पठारे, नारायण गलांडे, सुनील मलके आदी सहभागी झाले होते.

हेल्मेट दंड भरणाऱ्यानो भाजपला धडा शिकवा
अचानक पुणेकरांवर हेल्मेट सक्तीचा वरवंटा फिरवण्यात आला. कोणतेही प्रबोधन, प्रचार आणि प्रसार न करता पोलीस दलाकडून पुण्याच्या दुचाकी स्वरांची पिळवणूक करण्यात आली. कोट्यवधी रुपयांची लूट केली जात असताना पुण्याचे पालक मंत्री मात्र डोळे मिटून पुणेकरांचे हाल पाहत होते. शहराबाहेर राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावर सक्ती गरजेची आहे मात्र पुण्याचे अरुंद रस्ते, अत्यंत धीम्या गतीने ताशी 10 कि. मी. वेगाने चालणारी वाहतूक यामुळे हेल्मेट डोके वाचवण्याऐवजी डोकेदुखी ठरत असल्याचे जोशी म्हणाले. 23 एप्रिल 2019 ची लोकसभेची निवडणूक ही पुणेकरांना आलेली पर्वणी आहे. गांधीजींनी सांगितलेला सविनय कायदेभंगाचा मार्ग हेल्मेट बाबत पुणेकर आचरणात आणत आहेत. ज्या ज्या पुणेकरांचे हेल्मेट सक्तीवरून खिसे कापण्यात आले त्या त्या पुणेकरांच्या समोर निष्क्रिय गिरीश बापटांना घरी बसवण्याची संधी आली आहे. तीन लाख पुणेकरांना दंड झाला. हा कायदा संसदेने केला असल्यामुळे पुणेकरांनी संसदेत पाठवल्या नंतर प्रसंगी खासगी विधेयक मांडून शहरात हेल्मेट सक्तीचा कायदा रद्द करेन, अशी ग्वाही मोहन जोशी यांनी दिली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.