पुणे – उन्हाचा चटका वाढतोय…

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

पुणे – एप्रिल आणि मेमध्ये वाढणारा उन्हाचा चटका यंदा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा त्रास वाढण्याची भीती आहे. ही बाब लक्षात घेऊन पुणेकरांनी दक्षता घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागाने केले आहे.

प्रामुख्याने कडक उन्हात दुपारच्या वेळेत जास्त वेळ बाहेर राहिल्यास तसेच घट्ट कपडयाचा वापर केल्याने उष्माघात होण्याची भीती असते. उन्हाळयात जास्तीत जास्त पाणी प्यावे, प्रवास करताना सोबत पाणी ठेवावे, छत्री, गॉगल, टोपीचा वापर आवश्‍यक आहे. दरम्यान, उष्माघात टाळण्यासाठी लहान मुले अथवा प्राण्यांना बंद व पार्क केलेल्या वाहनात ठेऊ नये, दुपारी 1 ते 3 या कालावधीत उन्हात जाणे टाळावे, दुपारी 12 ते साडेतीन वाजेपर्यंत शारीरिक श्रमाची कामे टाळावीत तसेच महिलांनी उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करणे टाळावे, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

या मुळे होऊ शकतो उष्माघात
1) उन्हाळयात उघड्यावर मोठ्या प्रमाणात काम करणे
2) काच कारखाने, बॉयरल रूममध्ये काम करणे
3) जास्त तापमान असताना दुपारच्या वेळेत काम करणे
4) घट्ट कपड्यांचा वापर करणे

ही आहेत उष्माघाताची लक्षणे
1) थकवा, ताप, त्वचा कोरडी पडणे
2) भूक न लागणे, चक्‍कर येणे, डोके दुखणे
3) रक्तदाब वाढणे, मानसिक बैचेनी, बेशुद्ध पडणे

ही घ्या काळजी
1) तहान नसली तरी, जास्तीत जास्त पाणी घेणे
2) हलकी, पातळ व सच्छिद्र कपडे वापरणे
3) उन्हात गॉगल, छत्री, टोपी वापरणे
4) प्रवासाला जाताना पाणी सोबत ठेवावे
5) अशक्तपणा, चक्कर येत असल्यास डॉक्‍टरांचा सल्ला घ्यावा
6) शरीरातील पाणी कमी होत असल्यास लिंबू सरबत, पाणी, लस्सी घ्यावे.

Leave A Reply

Your email address will not be published.