पुणे : हिवाळा संपून उन्हाळ्याची सुरवात होताना होणाऱ्या हवामान बदलामध्ये गालगुंड या आजाराचे रुग्ण वाढताना दिसतात. विशेषत: लहान मुलांमध्ये हा आजार अधिक प्रमाणात दिसतो. हा आजार टाळण्यासाठी लहान मुलांना वेळीच एमएमआर लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञांनी केले आहे.
गालगुंड हा टाळता येण्याजोगा आजार आहे. याची मुख्य लक्षणे म्हणजे गाल फुगणे, ताप आणि थकवा ही आहेत. गालगुंडचा संसर्ग वेगाने पसरतो; पण योग्य वेळी लसीकरण करून आणि संसर्ग टाळण्याची काळजी घेतली, तर याचा धोका टाळता येईल. त्यामुळे लक्षणे आढळून येताच तपासणी करून घेण्याचे आवाहन वैद्यकीय तज्ज्ञांनी केले आहे.
गालगुंड टाळण्यासाठी मुलांना एमएमआर (गोवर, गालगुंड आणि रुबेला) लस देणे आवश्यक आहे. पहिली मात्रा ९ ते १२ महिन्यांदरम्यान व दुसरी मात्रा ४ ते ६ वर्षांदरम्यान दिली जाते. या आजारामध्ये लाळ ग्रंथींमध्ये सूज येते. त्यामुळे गाल फुगतात आणि हनुवटीला वेदना होतात. काही रुग्णांना गिळताना किंवा बोलताना त्रास जाणवतो. हा आजार झाल्यावर सुरुवातीला सौम्य ताप, थंडी वाजणे, डोकेदुखी, स्नायू दुखणे आणि भूक मंदावणे यांसारखी लक्षणे दिसतात. काही मुलांना थकवा आणि चिडचिडेपणाही जाणवतो.
ही आहेत लक्षणे
गालगुंड हा ‘पॅरामिक्सोव्हायरस’ नावाच्या विषाणूमुळे होतो. संक्रमित व्यक्तीच्या खोकल्यातून, शिंकांमधून किंवा लाळेमुळे हा संसर्ग पसरतो. त्यामुळे गालगुंड झाल्यास पुरेशी विश्रांती घ्या आणि पुरेसे पाणी प्या. गळ्याभोवती गार पाण्याचा किंवा बर्फ लावा. हलका आहार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्याने औषधोपचार घ्या. संसर्ग पसरू नये म्हणून रुग्णाने वेगळे राहावे. यामध्ये सहा महिने ते पंधरा वर्षे वयोगटांतील मुलांना याचा अधिक धोका असतो. लसीकरण न झालेल्या प्रौढांमध्येही गालगुंडाची गंभीर लक्षणे दिसू शकतात.
गालगुंड हा जरी सौम्य आजार आहे; परंतु काही वेळा गुंतागुंत वाढू शकते. यामुळे पालकांनी मुलांना ‘एमएमआर’ लस द्यावी.
– डॉ. महेश बडवे, बालरोगतज्ज्ञ