पुणे – महापालिकेच्या हद्दीतून वाहणाऱ्या मुठा नदीवर वाहने आणि पादचारी यांची ये-जा सुरळीत होण्यासाठी विविध पूल बांधले आहेत. वरवर पाहता अतिशय स्वच्छ आणि सुंदर दिसणाऱ्या या पूलांखाली मात्र घाणीचे साम्राज्य पसरल्याचे दैनिक “प्रभात’च्या पाहणीतून समोर आले. या पाहणीत संगमपूल ते राजारामपूल असे तब्बल 13 पूल यावेळी तपासण्यात आले.
पाहणीतील काही ठळक नोंदी
राजाराम पूल : पूल रुंदीकरणाचे काम सुरू असून आजूबाजूला झाडाझुडपांमध्ये बराच प्लॅस्टिक कचरा आणि पिशव्या टाकलेल्या दिसतात.
एस. एम. जोशी पूल ते भिडे पूल : जोशी पुलाखाली गणपती विसर्जन घाटावर कचरा आणि घाण सर्वत्र पसरली आहे. पुलाखाली उतरण्यासाठी असलेल्या जिन्यावर कचरा पसरल्याचे आढळले. पूना हॉस्पिटल ते संभाजी बाग या दरम्यानच्या भागात नदीपात्रात अनेक कुटुंबांनी आपले संसार मांडले आहेत. त्याचबरोबर या पूलांवरून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते. अशावेळी नदीपात्रात कपडे, थर्माकॉल, प्लॅस्टिक, कॅरीबाग असा कचरा पडलेला असतो. अनेकदा याठिकाणी राहणाऱ्या कुटुंबाकडून हा कचरा जाळला जातो. त्याचबरोबर मेट्रोचा राडारोडाही या परिसरात पडलेला असतो.
डेंगळे पूल : कुंभार वाडा चौकातून कॉंग्रेस भवनला जाणारा पूल सर्वात जास्त अस्वच्छ असल्याचे दिसून आले. पुलाच्या दोन्ही बाजूस कचऱ्याचे ढीग साचले असून, त्यामुळे दुर्घंधी पसरत आहे.