पुणे : पुणे पोलिसांनी मागील काही वर्षांत गुंडांच्या टोळ्यांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. यातील बहुतांश गुंड टाेळीचे म्होरके आणि साथीदारांना न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे. असे तब्बल ७२३ जण जामिनावर आहेत. यातील काही जण पुन्हा सक्रीय झाले आहेत. त्यांच्याकडून होणारे गंभीर गुन्हे राेखण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी या गुंडांवर करडी नजर ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
पुणे शहरात २०१९ पासून खून, खुनाचा प्रयत्न, तसेच दहशत माजविणाऱ्या गुंड टोळ्यांचे म्होरके आणि साथीदारांविरुद्ध पुणे पोलिसांनी “मोक्का’अंतर्गत मोठ्या प्रमाणात कारवाया सुरू केल्या. या गुंडांची कारागृहात रवानगी केली. यामुळे संघटित गुन्हेगारीला काही काळ चाप बसला. मात्र, कारवाईनंतर दोन ते तीन वर्षांत हे गुंड जामिनावर बाहेर पडले. त्यांनी पुन्हा आपली गुन्हेगारी कृत्ये सुरू केली. हे गुन्हेगार पोलिसांच्या दृष्टीने डोकेदुखी ठरले आहेत.
तर, झोपडपट्टी दादा प्रतिबंधक कायद्यान्वये (एमपीडीए) कारवाई केलेले २८५ गुंडही कारागृहातील स्थानबद्धतेचा कालावधी पूर्ण करून बाहेर पडले आहेत. मागील काळात मोक्कात जामिनावर सुटलेले, फरार असलेले आणि तडिपारीचा भंग केलेल्यांनी केलेले गुन्हे पाहता पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी चाप लावण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत.
मागील चार ते पाच वर्षांत पुणे शहर, उपनगरातील ३०० गुंड टोळ्यांवर मोक्का कारवाई करण्यात आली. यात दीड हजारांहून जास्त सराईतांचा समावेश आहे. कारवाईनंतर किमान दोन ते तीन वर्षे जामीन मिळत नाही. न्यायालयीन प्रक्रियेत जामीन मिळवण्यासाठी वेळ लागत असल्याने सराईतांनी “मोक्का’ची धास्ती घेतली. त्यामुळे गुन्हेगारी काहीशी घटली होती.
पोलिसांकडून “सिस्टिम अपडेट’
जामिनावर सुटल्यावर आरोपी आपले वास्तव्याचे ठिकाण आणि मोबाइल नंबर बदलतात. तसेच नियमित हालचालीचे कट्टेही बदलतात. यामुळे त्यांचा माग काढणे आणि त्यांच्यावर पाळत ठेवणे पोलिसांना कठीण जाते. यामुळे त्याचे फोन नंबर आणि राहण्याची ठिकाणेही पोलीस आपल्या सिस्टिममध्ये अपडेट करत आहेत.
प्रत्येक पोलीस ठाण्यातील अधिकारी, तपास पथके, तसेच गुन्हे शाखेच्या पथकांकडून “मोक्का’ कारवाईत जामिनावरील सुटलेल्यांची चौकशी सुरू आहे. त्यांची हालचाल, तसेच वास्तव्याच्या ठिकाणी पोलिसांनी नजर ठेवली आहे.
– निखील पिंगळे, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा
२०१९ ते २०२४ काळातील प्रकरणे
“मोक्का’ कारवाईत जामीन मिळवलेल्यांची संख्या – ७२३
“एमपीडीए’ कारवाईतून बाहेर पडलेल्यांची संख्या – २८३
पोलीस अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश
– जामिनावरील सराईतांची दैनंदिन झाडाझडती घ्यावी
– जामिनावरील गुंडांवर प्रतिबंधात्मक कारवाई सुरू करावी.
– प्रतिबंधात्मक कारवाईनंतर गुन्हा केल्यास त्यांच्यावर पुन्हा “मोक्का’ लावा