पुणे – तळोजा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर कार्यकर्ते आणि शेकडो वाहनांच्या ताफ्यासह पुण्याच्या दिशेने रॅली काढणाऱ्या कुख्यात गजानन मारणेचा अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आला आहे. या प्रकरणात सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी आदेश दिला आहे.
मारणे आणि त्याच्या साथीदाराविरोधात वारजे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. चांदणी चौकात 15 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला. गजा मारणे हा त्याच्या साथीदारांसह वाहनातून चांदणी चौकातून जात होता. यावेळी करोना काळात जमाव जमविल्याने परवानगी घेतली आहे का? अशी विचारणा करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास आरोपी संतोष शेलारने मोटारीच्या खिडकीतून हात बाहेर काढून ढकलले. तसेच नाही असे बोलून त्यांना न जुमानता कोथरूडच्या दिशेने निघून गेले. करोना प्रसाराच्या पार्श्वभूमीवर मास्क न लावता, सुरक्षित अंतर ठेवले नाही असे फिर्यादीत नमूद आहे.
याप्रकरणी गजानन मारणे याने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यांत जामीन मिळावा यासाठी अर्ज केला होता. त्यास अतिरिक्त सरकारी वकील राजेश कावेडीया विरोध केला.