Pune : तब्बल 14 वर्षापासून फरार चंदनचोर अटकेत

पुणे – चंदन चोरीच्या गुन्हयात तब्बल 14 वर्षापासून फरार असलेल्या आरोपीस वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याने 2007 मध्ये साथीदारांसमवेत गुन्हा केला होता. त्याच्या दोन्ही साथीदारांना पोलिसांनी जेरबंद केले होते. मात्र आरोपी सतत पोलिसांना गुंगारा देत होता. प्रताप आप्पा मिसाळ (38,रा.वेळापूर ता.माळशिरस जि.सोलापूर) असे अटक आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, फिर्यादी ए.एफ.एम.सी येथील सरकारी बंगल्यामध्ये सुपरविजनचे काम करतात. तेथे दि.24/6/2007 रोजी रात्री कोणीतरी अज्ञात चोरट्याने प्रिन्स ऑफ वेस्ट ड्राइव्ह रोड बंगला नं 6 या बंगल्याचे आवारातून चंदनाचे झाड चोरून नेले व बंगला नं 7 या बंगल्याचे आवारात चंदनाचे झाड कापून चोरण्याचा प्रयत्न केला.

यासंदर्भात वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. दाखल गुन्हयात यापुर्वी सोमनाथ महादेव साठे (रा.मु.पो.बेलापुर ता.माळशिरस जि.सोलापूर) व बाळु नारायण धोत्रे यास अटक केले होते. यातील निष्पन्न व पाहीजे आरोपी प्रताप मिसाळ हा 14 वर्षापासून पोलिसांना चकवा देत होता.

वानवडी पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस उप-निरीक्षक प्रदीप गुरव यांना आरोपीच्या ठावठिकाण्याची माहिती मिळाली होती. त्यानूसार माळशिरस येथून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. ही कामगिरी ही वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिपक लगड, पोलीस निरिक्षक(गुन्हे) सावळाराम साळगांवकर यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव, सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप गुरव, ज्ञानदेव गिरमकर, शिरिष गोसावी यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.