पुणे! इंधन दरवाढीची सामान्यांच्या खिशाला झळ; प्रवासी, मालवाहतुकीवरही परिणाम

* प्रवासी, मालवाहतुकीवरही परिणाम
* आगामी काळात वाहतुकीचे दर वाढण्याची शक्‍यता

पुणे – मागील काही दिवसांपासून सातत्याने इंधनाच्या दरात वाढ होत आहे. याची झळ सामान्यांच्या खिशाला बसत आहे. इतकेच नव्हे तर, याचा परिणाम प्रवासी आणि मालवाहतुकीवर होतो. परिणामी आगामीकाळात वाहतुकीचे दर वाढण्याची शक्‍यता आहे.

मागील वर्षापासून करोनामुळे लागू केलेल्या निर्बंधांमुळे विविध क्षेत्रांवर परिणाम झाला आहे. याला वाहतूक क्षेत्रदेखील अपवाद नाही. घटती मागणी आणि प्रवासी संख्या यामुळे वाहतूक क्षेत्रावर मोठा परिणाम झाला आहे. यातच इंधनाच्या दरवाढीची भर पडली असून, याचा परिणाम थेट वाहतुकीवर होणार आहे. त्यामुळे आगामीकाळात दरवाढ होणार असल्याचे सुतोवाच वाहतूकदारांनी केले.

इंधन वाढ झाल्याने याचा परिणाम दरवाढीवर होतो. प्रामुख्याने डिझेलच्या दरात वाढ झाल्यास मालवाहतुकीचे दर वाढण्याची शक्‍यता आहे, असे रिक्षा फेडरेशनचे बापू भावे म्हणाले.

देशात सध्या केवळ 30 टक्‍के मालवाहतूक सुरू आहे. वाहतूकदार आर्थिक आणि मानसिक कोंडीत अडकला आहे. डिझेलच्या दरात वाढ होत असल्याने साहजिकच वाहतुकीत दरवाढ होते. परंतु, याचा परिणाम महागाईवर होणार असून, यामुळे पुन्हा सामान्यांवरच याचा ताण येणार आहे. वेगवेगळ्या कराऐवजी सरसकट जीएसटी अंतर्गत दर लागू करावेत. भारतात डिझेलचा एकच दर असावा, अशी विनंती केंद्र सरकारला केली आहे.
– बाबा शिंदे, अध्यक्ष, राज्य वाहन मालक चालक प्रतिनिधी महासंघ

शहरात सुमारे 5 हजारापेक्षा अधिक स्कूलबस आणि कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांची वाहतूक करणाऱ्या 10 हजारांहून अधिक बसेस आहे. परंतु, सध्या व्यवसायच बंद आहे. त्यामुळे लगेच परिणाम जाणवणार नाही. करोनामुळे सुमारे 70 टक्‍के वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे सरकारने सर्वप्रथम निर्बंधांसह व्यवसाय सुरू करण्याची परवानगी द्यावी. सातत्याने होणाऱ्या दरवाढीचा आगामी काळात परिणाम होण्याची शक्‍यता आहे.
– राजेंद्र जुनावणे, उपाध्याक्ष पुणे बस ओनर्स असोसिएशन

सलग इंधनाचे दर वाढत आहेत, त्यामुळे वाहनाचा खर्चदेखील वाढत आहे. यामुळे दरवाढ करणे आवश्‍यक आहे. मात्र, यामुळे ग्राहक मिळण्याची शक्‍यता कमी होते. पैसे देताना अनेकदा ग्राहक आणि वाहतूकदारांमध्ये वादावादी होते. याशिवाय, स्पर्धादेखील जास्त असल्याने दरवाढ करताना विचार करावा लागतो.
– अनिल भोसले, मालवाहतूकदार

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.