पुणे – शहर परिसरात किमान तापमानात सातत्याने घट होत असून, शहरातील थंडीचा पारा वाढला आहे. शहरात सोमवारी 9.6 अंश सेल्सिअस इतक्या किमान तापमानाची नोंद हवामान विभागाकडून घेण्यात आली आहे.
शहरात थंड हवामानासह व्हॅलेंटाईन सप्ताहाला सुरुवात झाली असून, गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात सातत्याने घट नोंदविली जात आहे. हवामान विभागाने आगामी संपूर्ण आठवडा कोरड्या हवामानाचा अंदाज वर्तविला आहे. शहरात आगामी काळात तापमान कमी राहील असा अंदाज असल्याने यंदाचा “व्हॅलेंटाईन डे’ थंड वातावरणात साजरा करता येईल, अशी चर्चा रंगत आहे.
विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात बऱ्याच भागात तापमानात सतत घसरण होत आहे. विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ भागात. मध्य प्रदेश ते विदर्भदरम्यान कमी दाबाचा पट्टा पूर्णपणे गायब झाला आहे, जो देशाच्या उत्तरेकडील भागातून वाहणाऱ्या थंड वाराला अडथळा निर्माण करीत होता. राज्यातून वाऱ्यांच्या प्रवाहासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाल्याने थंड हवेच्या परिणामामुळे वातावरणात बदल होत आहे.
तापमानातही सातत्याने घटत आहे. नुकतेच आठवड्यातून दोनवेळा पुणे हे राज्यातील सर्वात थंड शहर म्हणून नोंदले गेला. सोमवारी (दि.8) शहरात किमान तापमान 9.6 अंश सेल्सिअस नोंदले गेले. गेल्या तीन महिन्यांतील हे सर्वात कमी किमान तापमान असल्याचे विभागाच्या नोंदीतून समोर आले आहे. मात्र, यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.