पुणे – छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवून मोफत वीज मिळविण्याच्या ‘पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज’ योजनेत आता ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य पुरविण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांना सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीजनिर्मिती झाली व घरामध्ये किती विजेचा वापर झाला, याची अद्ययावत माहिती मोबाइल ॲपवर उपलब्ध होणार आहे.
महावितरणचे अध्यक्ष लोकेश चंद्र यांनी ही माहिती दिली. महिना तीनशे युनिटपर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज मिळावी आणि अतिरिक्त वीज विकून उत्पन्न मिळावे, यासाठी पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अंतर्गत तीन किलोवॅटपर्यंतच्या क्षमतेचे प्रकल्प बसविणाऱ्या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते.
प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत ग्राहकाच्या छतावर बसविलेल्या सौर ऊर्जा प्रकल्पात किती वीज तयार झाली, ग्राहकाने घरात किती वीज वापरली व किती अतिरिक्त वीज ग्राहकाकडून महावितरणला विकली गेली याची नोंद करण्यासाठी एक वेगळा नेट मीटर बसवावा लागतो.
आतापर्यंत त्याचा खर्च ग्राहकाला करावा लागत होता. आता महावितरणने ग्राहकांना सोलर नेट मीटर विनामूल्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ग्राहकांचे पैसे वाचण्यासोबत त्यांना मोबाइल फोनवरच वीजनिर्मिती, वीज वापर, अतिरिक्त युनिट इत्यादी माहिती दररोज मिळेल. त्यानुसार त्यांना वीजवापराचे नियोजन करता येईल.
योजनेची राज्यातील सद्यस्थिती
आतापर्यंत ३ लाख २३ हजार ग्राहकांनी या योजनेसाठी अर्ज केला आहे. त्यातील ८३,०७४ ग्राहकांच्या घराच्या छतावर सौर ऊर्जानिर्मिती प्रकल्प बसवण्यात आला आहे. या सर्वांना सोलर नेट मीटर विनामूल्य मिळणार आहे. त्यांना केंद्र सरकारकडून ६४७ कोटी रुपये अनुदान मंजूर झाले आहे.