पुणे- वन्यजीवांचा अधिवास असलेल्या तळजाई राखीव वनक्षेत्रात खासगी वाहन नेण्यासाठी बंदी आहे. मात्र, रविवारी सायंकाळी येथे एक खासगी वाहन मुक्तसंचार करत होते. याबाबत वनविभागाकडे चौकशी केली असता, “त्या वाहनातून झाडांसाठी कंपोस्ट खत नेण्यात आले,’ असा अजब दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. टेकडीच्या आतील भागात वनविभागाचे काम सुरू असून आत माती तसेच इतर साहित्य नेण्यासाठी ट्रॅक्टर तसेच छोटे टेम्पो उपलब्ध आहेत. तरीही, अलिशान कारमध्ये खते घेऊन कोणी जाईल का? असा प्रश्न उपस्थित होतो. या कारमध्ये एक अल्पवयीन मुलगा आणि चालक होते, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
तळजाई वनक्षेत्रात मोर आणि विविध प्रजातींचे पक्षी, ससा आणि अन्य प्राणी आढळतात. याव्यतिरिक्त रानफुलांच्या असंख्य प्रजाती, निलगिरी, कडुलिंब, कांचनवृक्ष असे कितीतरी वृक्षप्रकार आहेत. येथील वनविहारात मोरांसाठी ठिकठिकाणी धान्य पाण्याची व्यवस्था आहे. जैविविधतेने संपन्न या भागास राखीव वनक्षेत्राचा दर्जा आहे. वन्यजीवांना त्रास होऊ नये आणि प्रदेशाचे योग्य संवर्धन होण्यासाठी वनक्षेत्रात वाहनांना प्रवेश बंदी आहे. मात्र, रविवारी सायंकाळी वनक्षेत्रात एक खासगी वाहन मुक्तपणे फिरत होते. तेथील नागरिकांनी “प्रभात’ला ही माहिती दिली. यासंदर्भात वनविभागाकडे चौकशी केली असता, भांभुर्डा वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप संकपाळ यांनी “संबंधित गाडीतून झाडांसाठी कंपोस्ट नेले’ अशी माहिती दिली. मात्र, वनविभागाकडे स्वत:ची शासकीय वाहने असताना, खासगी वाहनातून तेही माहितीफलक न लावता अशा वस्तूंची वाहतूक करणे योग्य आहे का? वनक्षेत्रात खासगी गाडीचा वापर का केला जावा? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
वन विभागाच्या कारभारावरच प्रश्नचिन्ह
तळजाई टेकडीच्या आत आढळलेल्या या वाहनाची नंबरप्लेट खासगी मालकीच्या वाहनासारखी पांढरी आणि एमएच-09 या पासिंगची होती. त्यामुळे झाडांना खत घेऊन खासगी वाहन आले, तरी ते आत कसे जाऊ शकते असा प्रश्न आहे. येथे पर्यावरणप्रेमी नागरिक वृक्षारोपण करतात. अनेक जण येथील झाडांसाठी 5 लिटरच्या कॅनमध्ये पाणी आणतात. मात्र, हे नागरिक प्रवेशद्वारापासून पायी जातात. त्यामुळे खत नेणाऱ्यांचे वाहन आत कसे येऊ शकते? हा प्रश्न आहे. एखाद्या खासगी वाहनाला वन विभागानेच आत जाण्यास मुभा दिली असल्यास, प्रशासन स्पष्ट माहिती का देत नाही असा सवालही पर्यावरण प्रेमींनी उपस्थित केला आहे.