पुणे- पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त 214 शिपाई पदासाठीची मंगळवारी (दि.5) लेखी परीक्षा झाली. त्यासाठी 79 केंद्रावर तब्बल पावणेतीन हजार पोलीस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांचा फौजफाटा तैनात होता.
मात्र, परीक्षेसाठी फक्त 31 टक्केच उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, परीक्षेला बसलेल्या तीन डमी उमेदवारांवर कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात दोन तर सिंहगड पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयातील रिक्त झालेल्या 214 पोलिस शिपाई पदासाठी 2019 मध्ये जाहिरात देण्यात आली होती. मात्र, करोनामुळे पोलीस भरती प्रक्रिया लांबणीवर पडली होती. आता करोना संसर्ग कमी झाल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार 214 पदांसाठी तब्बल 39 हजार 323 उमेदवारांनी अर्ज केले होते. मात्र, परीक्षेला खूपच कमी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.