पुणे – खडकवासला धरणसाखळी क्षेत्रात शुक्रवारी रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे शनिवारी दुपारपासून खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग करण्यात आला. त्यापूर्वी पोलिसांनी भिडे पूल ते टिळक पुलापर्यंत जवळपास ७० ते ८० चारचाकी वाहने पुराच्या पाण्यात अडकली. वाहने नदीपात्रात उभी करून नागरिक खरेदीसाठी बाजारपेठेत गेले. पूर येण्याची माहिती नसल्याने त्यांनी जागा मिळेल तिथे वाहने लावली. परिणामी, ही वाहने पाण्यात अडकून पडली.
मुठा नदीपात्रात पाणी येणार असल्याने दुपारी तीन वाजेपासूनच वाहने काढून घेण्याच्या सूचना पोलिसांनी नागरिकांना दिल्या. मात्र, अनेक वाहनचालक जागेवर नव्हते. कामानिमित्त ते इतरत्र गेले होते. त्यामुळे पोलिसांनी वाहन मालक आणि वाहनांच्या क्रमांकाची नोंदणी असलेल्या वाहतूक पोलिसांच्या अॅपवर मालकांचे नंबर शोधून त्यांना वाहने तत्काळ काढण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर अनेकांनी नदीपात्रात धाव घेत वाहने काढली. मात्र, पाणी वाढतच असल्याने अनेकांना वाहने त्याच ठिकाणी सोडावी लागली.
स्थानिक नागरिक धावले मदतीला
वाहने पाण्यात गेल्यानंतर ती सुरू करून बाहेर काढणे अनेकांना शक्य नव्हते. अशा वाहनचालकांना स्थानिक नागरिक तसेच पोलिसांनी मदत करत वाहने ढकलत पाण्याबाहेर काढली.
ढोल-ताशा पथकांना पुन्हा फटका
मागील महिन्यात पुरामुळे नदीपात्रातील अनेक ढोल-ताशा पथकांचे मांडव तसेच वादनाचे साहित्य वाहून गेले. या मंडळांनी पुन्हा नदीपात्रातच मांडव घालून सराव सुरू केला. मात्र, शनिवारी पुन्हा अनेक मंडळाचे मांडव वाहून गेले. काही मंडळाच्या साहित्याचे नुकसान झाले असून सरावाच्या ठिकाणी पुन्हा गाळाचे ढीग साचले आहेत.