पुणे : गुलेन बॅरे सिंड्रोमचे (जीबीएस) नव्याने चार रुग्ण सापडले असून, त्यातील पिंपरी-चिंचवड शहरातील तीन आणि पुणे ग्रामीणमधील एका रूग्णाचा समावेश आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यातील जीबीएस बाधित रुग्णसंख्या १८० इतकी झाली आहे. त्यातील ७९ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, तर २२ रुग्ण व्हेंटीलेटरवर आहेत. ५८ रुग्णांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.
मागील तीन आठवड्यापासून पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि ग्रामीण भागात दूषित पाणी आणि अन्न सेवनामुळे उलट्या, जुलाब, पोटदुखीच्या समस्या वाढल्या आहेत. त्यातच जीबीएस रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. विशेषत: धायरी, नांदेडगाव, सिंहगडरस्ता, किरकटवाडी, खडकवासला या भागातील रुग्णसंख्या अधिक आहे. त्यापाठोपाठ आता पिंपरी-चिंचवड, पुणे शहर आणि ग्रामीण भागातही रूग्ण वाढत आहेत.
पुणे शहर आणि जिल्ह्यात १८० संशयीत जीबीएस बाधित रूग्णांपैकी १४६ रूग्णांना जीबीएस झाल्याचे निदान निश्चित झाले आहे. त्यामध्ये सहा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांमध्ये ३५ रुग्ण पुणे महापालिका कार्यक्षेत्रातील असून, सर्वाधिक रुग्णसंख्या (८८) ही समाविष्ट गावातील आहे. २५ रुग्ण पिंपरी-चिंचवड महापालिका, २४ रुग्ण पुणे ग्रामीण तर ८ रुग्ण हे इतर जिल्ह्यातील आहेत.
जीबीएसची स्थिती
वय – एकूण रुग्णसंख्या
० ते ९ – २४
१० ते १९ – २३
२० ते २९ – ४१
३० ते ३९ – २२
४० ते ४९ – २२
५० ते ५९ – २६
६० ते ६९- १६
७० ते ७९ – २
८० ते ८९ – ४