पुणे : शहरात करोनाने थैमान घातले ससून अनेक जणांना बेड मिळत नसल्याने प्राण गमवावे लागत आहेत. त्यामुळे ससून रूग्णालयात कोविड रुग्णांसाठी नव्याने 400 बेड तयार करण्यात येत आहे त्यासाठी नव्याने 350 नर्सेसची भरती करण्यात आलेली आहे. त्यांच्या 3 वेळेच्या जेवणाची व्यवस्था करावी असे आवाहन ससून रूग्णालयाकडून करण्यात आले होते.
या आवाहनाला प्रतिसाद देत तसेच सामाजिक जबाबदारीचे भान राखत माजी महापौर प्रशांत जगताप यांनी पुढाकार घेतला असून ‘प्रशांत जगताप मित्र परिवाराच्या’ वतीने रुग्णालयाला 350 नर्सेसच्या पुढील 60 दिवसाच्या जेवणाच्या व्यवस्थेकरिता पाच लाख रूपयांचा धनादेश जगताप यांनी ससून रूग्णालयासाठी दिला आहे.
हा धनादेश राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कौन्सिल हॉल येथे प्रदान करण्यात आला. ससून रुग्णालयाचे डीन डॉ.श्री. मुरलीधर तांबे, अधिक्षक डॉ. श्री. अजय तावरे यावेळी उपस्थित होते.
शहरातील करोनाची स्थिती गंभीर आहे. त्यासाठी प्रत्येकाने पुढे येऊन सर्वोत्परी मदत करण्याची गरज आहे. त्याची सुरूवात स्वत:पासूनच करत करोनाग्रस्तांसाठी वेगवेगळे उपक्रम प्रशांत जगताप मित्र परिवाराकडून वारंवार राबविले जात आहेत. त्याचाच, एक भाग म्हणून ससूनला ही मदत करण्यात आली असून परिचारकांच्या जेवणाचा प्रश्न मिटणार आहे. त्याचा विशेष आनंद आहे. – प्रशांत जगताप ( माजी महापौर )