पुणे – विधानसभा निवडणुकीत मतदार यादीतील घोळाचे प्रकार कायम असल्याचे दिसून आले. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असल्याचे चित्र असले, तरी या निवडणुकीत त्याचे स्वरूप वेगळे होते. लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघातील मतदारांची यादीतील नावे गायब होती, तर या वेळी ही नावे परत आली.
मात्र, मतदारांचे नाव आणि छायाचित्रच बदलले असल्याचे समोर आले. अनेक मतदारसंघात मतदान केंद्रे बदलण्यात आल्याने, तसेच त्याबाबत आवश्यक जनजागृती न झाल्याने अनेकांना आपली नावे शोधण्यात मोठा वेळ घालवावा लागला. त्यामुळे मतदारांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. अनेक ठिकाणी मतदानाला आलेल्या नागरिकांना ऐन वेळी फोन बाहेर ठेवण्याच्या सूचना करण्यात आल्याने नागरिकांची तारांबळही झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र, बंदी असतानाही अनेकांनी मतदान केल्याचे फोटो काढले असून ते सोशल मीडियावरही टाकले आहेत.
मतदान ओळखपत्र फेटाळले
विधानसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांत नागरिकांची मतदान ओळखपत्रे २० ते ३० वर्षे जुनी आहेत. त्यामुळे त्यांचे तारुण्यातील फोटो आहेत. त्यामुळे आता अनेकांच्या चेहऱ्यात बदल झालेला असून, सध्याचे फोटो आधारकार्ड, तसेच इतर ओळखपत्रांंवर आहेत. मतदान केंद्रावर असलेल्या यादीतील फोटो कृष्णधवल आहेत.
त्यामुळे फोटो मॅच होत नसल्याने मतदान ओळखपत्र घेऊन आलेल्या अनेक नागरिकांना मतदान न करता परतावे लागले. त्यावरून कोथरूड, कॅन्टोन्मेंट, खडकवासला, पर्वती, मतदारसंघांत अनेक केंद्रांवर गोंधळ झाल्याचे पाहावयास मिळाले.
मोबाइलवरून अडवणूक?
जिल्हा प्रशासनाकडून मतदान केंद्राच्या १०० मीटर परिसरात मोबाइल वापरता येणार नसल्याची घोषणा मतदानाच्या दोन ते तीन दिवस आधी करण्यात आली. मात्र, नागरिकांमध्ये याची जनजागृती झाली नाही. परिणामी, अनेक नागरिक सकाळी व्यायाम, तसेच चालण्यासाठी घरबाहेर पडताना मोबाइल घेऊन निघाले होते. मात्र, अचानक मोबाइल बाहेर ठेवण्यास सांगितल्याने मतदार आणि पोलिसांंमधे वाद झाला, तर काहींनी मोबाइल आतपर्यंत नेले त्यावरूनही अनेक केंद्रावर मतदार आणि पोलिसांमध्ये गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.
नावच बदलले
खडकवासला मतदारसंघात उमेदवारांना दिलेल्या मतदार चिठ्ठ्या आणि प्रत्यक्षात मतदान केंद्रावरील नावात बदल असल्याचे समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे यादी क्रमांक, मतदान ओळख क्रमांकपण एकच आहे. मात्र, नावात बदल झाला आहे. सनसिटी येथील भाजी मंडई केंद्रावर सुरेखा बगाडे या मतदानासाठी चिठ्ठी घेऊन आल्या होत्या; पण प्रत्यक्ष मतदार यादीत त्यांचा फोटो होता. मात्र, नाव शाहिना दुधाळ असे नमूद केलेले होते. मतदान ओळखपत्र क्रमांक बगाडे यांचा होता. मात्र, ही तफावत असल्याने त्यांना केंद्रावरून मतदान न करताच परत पाठविण्यात आले.