ना. डॉ. अतुल भोसले यांचा पुढाकार
कराड – गेल्या अनेक वर्षांपासून ओंड-ओंडोशी परिसरातील ग्रामस्थ मोकाट जनावारांमुळे त्रस्त आहेत. 150 हून अधिक मोकाट जनावरे उभ्या पिकांची नासधूस करत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शेतकऱ्यांची या त्रासातून मुक्तता करण्यासाठी श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष ना. डॉ. अतुल भोसले यांनी पुढाकार घेतला आहे.
वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांचे आदेशावरुन पुणे वनविभागातील तज्ज्ञांच्या टीमला या मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी कराड येथे लवकरच पाचारण करण्यात येणार असल्याची माहिती ना. अतुल भोसले यांनी दिली.
ओंडोशी, ता. कराड येथे गेल्या अनेक वर्षांपासून मोकाट जनावरांमुळे त्रस्त झालेल्या ओंड-ओंडोशीसह आपसापासच्या गावातील लोकांनी हा प्रश्न निकालात निघावा, यासाठी ना. डॉ. अतुल भोसले यांची नुकतीच भेट घेतली होती.
त्यावेळी झालेल्या चर्चेनुसार ओंडोशी (ता. कराड) येथे डॉ. भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत कराड वनविभागाचे अधिकारी ए. एम. साजणे आणि शेतकरी यांची संयुक्त बैठक घेण्यात आली. या बैठकीत आपले गऱ्हाणे मांडताना शेतकऱ्यांनी मोकाट जनावरांमुळे होत असलेल्या त्रासाचा पाढाच वाचला.
या बैठकीत ना. भोसले यांनी तात्काळ वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्या कार्यालयाशी संपर्क करून याप्रकरणी वनविभागाने लक्ष घालावे अशी विनंती केली. डॉ. भोसले यांच्या विनंतीची दखल घेत संबंधितांनी ओंड-ओंडाशी परिसरातील मोकाट जनावरांचा प्रश्न मार्गी लावण्याची जबाबदारी पुणे वनविभागाच्या तज्ज्ञ टीमकडे सोपवित असल्याचे सांगितले.