पुणे -लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही अन्य राज्यातून कोणत्याही वाहनाद्वारे पुणे शहरात यायचे असल्यास संबधितांना आता 48 तास आधी करोना चाचणी निगेटिव्ह असल्याचा अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक असणार आहे. त्याबाबतचे सुधारित आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी काढले आहेत. या आदेशानुसार, राज्यशासनाच्या धर्तीवर पुण्यातही आता 1 जूनपर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असून वीकेंड लॉक़डाऊन कायम असणार आहे. तर विकेंडच्या लॉकडाऊनमध्ये किराणा दुकानदारांना दूध विक्री आणि घरपोच दूध पुरविण्याच्या सुविधेसही मान्यता देण्यात आली आहे.
मागील दोन महिन्यांपासून शहरात करोनाच्या साथीने थैमान घातले आहे.ही साथ ओसरण्यास सुरुवात झालेली असल्याने शहरातील लॉकडाऊनमध्ये शिथिलता येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तर शहराप्रमाणेच राज्यातील इतर शहरांमध्येही रुग्णसंख्या घटल्याने शासनाकडूनच काही आणखी व्यावसायिकांना लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याबाबत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या कमी होत असली तरी जगभरातील आरोग्य तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिल्याने शासनाकडून खबरदारीचा उपाय म्हणून राज्यातील लॉकडाऊन 1 जून पर्यंत वाढविण्यात आले आहे.
त्यामुळे, महापालिकेनेही शासनाचा निर्णय कायम ठेवत शहरातील लॉकडाऊन वाढविले आहे. मात्र, त्या सोबतच खबरदारीचा उपाय म्हणून या पुढे शहरात रेल्वे, बस, तसेच खासगी बस, खासगी वाहनांद्वारे पुणे शहरात प्रवेश करणाऱ्या नागरिकांना करोना चाचणी केलेला आरटी-पीसीआरचा निगेटीव्ह असलेला तपासणी अहवाल सोबत बाळगणे बंधनकारक केले आहे.