पुणे – विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहायक प्राध्यापक पदासाठी आवश्यक असलेल्या विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षेच्या (यूजीसी नेट) अर्जांसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. आता उमेदवारांना 30 मेपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
“यूजीसी’चे अध्यक्ष प्रा. जगदेश कुमार यांनी ट्विटद्वारे ही माहिती दिली. ही परीक्षा वर्षातून दोनवेळा घेतली जाते. मात्र, करोनामुळे डिसेंबर 2021ची परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. त्यामुळे परीक्षांचे सत्र सातत्य कायम ठेवण्यासाठी डिसेंबर 2021 आणि जून 2022 ची परीक्षा एकत्रितरित्या घेतली जाणार आहे.
नेट परीक्षेसाठी अर्ज करण्यास मुदतवाढ मिळावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत होती. अर्ज आणि शुल्क भरण्यासाठी आता उमेदवारांसाठी 30 मे ही अंतिम मुदत असेल.