पुणे- अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) सुधारित शुल्क रचना निश्चित केली आहे. विशेषत: अभियांत्रिकी व तंत्रशिक्षणच्या अभ्यासक्रमाचे पहिल्यांदाच किमान शुल्क निर्धारित केले असून, तसा प्रस्ताव “एआयसीटीई’ने केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडे सादर केला आहे. त्यामुळे लवकरच अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचे किमान शुल्करचना निर्धारित होणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
अभियांत्रिकी आणि तंत्रशिक्षणासाठी शिखर संस्था असलेल्या “एआयसीटीई’ने अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण संस्थांकडून आकारण्यात येणाऱ्या शिक्षण शुल्कात बदल होणार आहे. जवळपास 7 वर्षानंतर शुल्क रचनेत बदल होणार आहे. यापूर्वी एका तज्ज्ञ समितीने “शिक्षण शुल्क म्हणून संस्था किती शुल्क आकारू शकतात, याची उच्च मर्यादा निश्चित करावी,’ अशी शिफारस केली होती. मात्र आजपर्यंत “शिक्षण शुल्क’ची किमान मर्यादा निश्चित करण्यात आली नव्हती. हा प्रस्ताव शिक्षण मंत्रालयाने मान्य केल्यास किमान शुल्क निश्चिती होणार आहे.
निवृत्त न्यायमूर्ती बी.एन. श्रीकृष्ण यांच्या अध्यक्षतेखालील “एआयसीटीई’ कार्यकारी समितीने 10 मार्च रोजी राष्ट्रीय शुल्क समितीचा अहवाल मंजूर करुन शिक्षण मंत्रालयाकडे पाठवला असून यावर कार्यवाही केली जात आहे. त्यांच्याकडून आणि राज्य सरकारकडून मंजुरी मिळाल्यानंतर ही शुल्क रचना लागू होणार आहे. या निर्णयामुळे देशभरातील हजारो विद्यार्थी आणि पालकांना आर्थिक दिलासा मिळण्यासह त्यांची पिळवणूक थांबणार आहे.
असा आहे प्रस्ताव
पदवीपूर्व अभ्यासक्रम : वार्षिक किमान शुल्क 79 हजार रुपयांपेक्षा कमी असू शकत नाही. तर कमाल शुल्क 1 लाख 89 हजार रुपये.
पदव्युत्तर अभ्यासक्रम : वार्षिक किमान शुल्क 1 लाख 41 हजार, तर कमाल शुल्क 3 लाख 3 हजार रुपये प्रस्तावित