पुणे : दिवसभर ऊन आणि रात्री गारव्यामुळे पुणेकरांचे आरोग्यही बिघडत आहे. गेल्या २४ तासांत शहराच्या काही भागातील किमान तापमानात एक ते दोन अंशांनी घट झाली. त्यामुळे हवेली, माळीण, शिवाजीनगर, एनडीए परिसरात रात्री थंडी जाणवत आहे. तर दिवसभर कमाल तापमान ३४ अंशांपुढे जात असल्यामुळे उन्हाचा चटका जाणवत आहे.
नवीन वर्षाच्या सुरवातीला सुरू झालेला थंडीचा कडाका दोन ते तीन दिवसात कमी झाला. त्यानंतर शहरासह जिल्ह्यातून थंडी गायब झाली. मागील आठवड्यात काही भागात अवकाळी पाऊस झाला.
दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून शहरात पुन्हा किमान तापमानात घट होऊ लागली आहे. तीन ते चार अंश सेल्सिअसने तापमानात घटल्यामुळे १६ अंशांवर पोहचलेले किमान तापमान १० अंशांपर्यंत खाली आले आहे.
शहरासह जिल्ह्यातील किमान तापमान
हवेली- १०.४, माळीण आणि शिरूर- ११.५, एनडीए- ११.८, बारामती- १२.६, शिवाजीनगर- १२.७, आंबेगाव- १२.८, पाषाण- १३, इंदापूर- १३.५, पुरंदर- १४, राजगुरूनगर – १४.१, लवासा- १५.२, लोणावळा- १६.३, कोरेगांव पार्क- १७.१, चिंचवड- १७.९, मगरपट्टा आणि वडगावशेरी १८.३ अंश से.