पुणे – खडकवासला धरणातून २५ जुलैच्या रात्री अचानकपणे मुठा नदीत ५५ हजार क्युसेकपेक्षा अधिक विसर्ग करण्यात आला. यामुळे सिंहगड रस्त्यावरील एकतानगर, पुलाची वाडीसह विविध भागांत पाणी शिरले. ही पूरस्थिती नेमकी कशामुळे उद्भवली? याचा शोध घेण्यासाठी व भविष्यात असे प्रकार रोखण्यासाठी महापालिकेकडून चार सदस्यांची समिती नेमण्यात आली. या समितीने आठ दिवसांत अहवाल आयुक्तांना सादर करायचा होता. मात्र, महिना उलटूनही समितीचा अहवालच तयार झाला नसल्याचे समोर आले आहे.
या समितीत अधीक्षक अभियंता साहेबराव दांडगे, दिनकर गोजारे तसेच कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे यांचा समावेश आहे. तर, जलसंपदा विभागाच्या सुनंदा जगताप या कार्यकारी सदस्य आहेत. मात्र, या समितीला आवश्यक असलेली जलसंपदा विभागाकडील माहितीच मिळत नसल्याने अहवाल रखडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे अहवाल तयार करण्यासाठी आणखी पंधरा ते वीस दिवस लागणार असल्याचे समिती सदस्यांकडून सांगण्यात येत आहे.
काय करणार अभ्यास ?
या समितीने प्रत्यक्षात प्रत्यक्ष पूरस्थिती उद्भवलेल्या जागांची पहाणी करणार आहे. या भागांत रस्त्यावर पाणी साठणे, पाण्याचा निचरा लवकर न होणे, रहिवासी संकुलांत पाणी शिरणे या कारणांचा अभ्यास करणार आहे. तसेच अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आपत्कालीन उपाययोजना काय असाव्यात, याची शिफारसही करावी, नागरिकांशी तसेच पर्यावरण तज्ज्ञ यांच्याशी चर्चा करून त्यानुसार अहवाल सादर करायचा आहे. खडकवासला धरणापासून ते बंडगार्डन पर्यंत पाण्याच्या प्रवाहाला किती व कोणते अडथळे आहेत, याची तपासणी करून त्यांची नोंद अहवालात केली जाणार आहे.
समितीने आतापर्यंत काय-काय केले?
– पूरस्थिती उद्भवलेल्या नदीच्या सर्व परिसरांची तपासणी केली. स्थानिक नागरिकांशी चर्चाही केली आहे.
– नागरिकांच्या सूचना, माहितीनुसार पुन्हा एकदा पाहणी केली
– पूरस्थिती का उद्भवली याची कारणे शोधली
– पाटबंधारे विभागाकडून पाणी सोडण्याबाबतचे निर्णय तसेच देण्यात येत असलेल्या सूचना याची माहिती मागविली.