पुणे : कोथरूड, सिंहगड रस्त्यावरील धायरी, तसेच उत्तमनगर भागांत दहशत माजविणाऱ्या पाच सराईतांना परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश दिले आहेत.
कोथरूड भागात दहशत माजविणारे सराइत ओंकार ऊर्फ आबा शंकर कुडले (२९, रा. शास्त्रीनगर, कोथरूड), प्रसाद ऊर्फ मुन्ना भगवान मोरे (२०, रा. भूमकर चाळ, कोथरूड) यांना शहर आणि जिल्ह्यातून दाेन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले.
सिंहगड रस्त्यावरील धायरी परिसरातील गुंड महेश सतीश रोंगे (१९, रा. मल्हार बिल्डिंग, धायरी, सिंहगड रस्ता), तसेच उत्तमनगर भागातील गुंड अभिजित भीमाशंकर देशमाने (२४), राहुल गणपत जांभुळकर (२७, दोघे रा. देशमुखवाडी, शिवणे) यांना तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कुडले, मोरे, रोंगे, देशमाने, जांभुळकर यांच्याविरुद्ध गंभीर गुन्हे दाखल आहेत.
त्यांच्या दहशतीमुळे नागरिक तक्रार देत नव्हते. त्यांना पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर, तसेच जिल्ह्यातून तडीपार करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी प्रस्तावाची पडताळणी केली. त्यानंतर त्यांना शहर आणि जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश देण्यात आले.