कोथरूड – चांदणी चौकातील जुना उड्डाणपुल पाडण्यापूर्वी पर्यायी रस्ता तात्काळ उपलब्ध करण्यासाठी आज चौकात “रॉक ब्लास्टिंग’ करण्यात आले. चौकातील खडक मोठा आणि मजबुत असल्यामुळे पोकलॅन, जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यास वेळ लागत आहे. त्यामुळे खडक फोडण्यासाठा आज (दि. 21) पहिला ब्लास्ट करण्यात आला.
चांदणी चौकातील जुना उड्डाणपुल पाडण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी 15 सप्टेंबरचा मुहुर्त काढला. त्यानंतर दि. 18 आणि आता 22 तारीख ठरविली. मात्र पुल पाडल्यानंतर पर्यायी रस्ता कोणता? जे रस्ते उपलब्ध आहेत, त्या रस्त्याने वाहने वळविली तर वाहतुक कोंडींत आणखीन भर पडेल. त्यामुळे पर्यायी रस्ते उपलब्ध झाल्याशिवाय पुल पाडणे शक्य नाही. पर्यायी रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे. परंतू, पुलाच्या एका बाजुला माती तर दुसऱ्या बाजूला (बंजारा हिल हॉटेलची बाजू) संपूर्ण खडक आहे.
हा खडक मजबुत असल्यामुळे पोकलॅन, जेसीबीच्या सहाय्याने तोडण्यास वेळ लागत आहे. या गतीने काम केले तर पर्यायी रस्ता सुरू होण्यास अधिक वेळ लागेल. त्यासाठी संबधीत पुल पाडण्याच्या कंपनीने येथील खडक ब्लास्ट करून फोडण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार बुधवारी (दि. 21) सकाळी हा ब्लास्ट करण्यात आला. ब्लास्टमुळे रस्त्यावर आलेले दगड तात्काळ बाजूला करून काही मिनिटात रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात आला.
त्यामुळे पुल पाडता येत नाही…
चांदणी चौकातील जुना उड्डाणपुल पाडल्यानंतर 12 ते 15 तासाचा ब्लॉग असणार आहे. हा फुल पहाटेच्यावेळी पाडण्यात येणार असल्याचे संबधित कंपनीकडून सांगण्यात आले. मात्र, सध्या कोथरूड, सातारा या रस्त्याने मुळशी, बावधन, मुंबईला जाण्यासाठी एकच पर्यायी मार्ग उपलब्ध आहे. परंतू मुंबई, मुळशी, पाषाण आणि बावधनकडून कोथरूड, सातारा याठिकाणी जाणाऱ्या वाहनांना पर्यायी रस्ताच उपलब्ध नाही. त्यामुळे ही वाहतूक एका रस्त्याने वळविली तर वाहतुक कोंडीचा फज्जा उडेल. त्यामुळे पर्यायी मार्ग तयार झाल्याशिवाय पुल पाडणे शक्य नाही. सध्या चौकातील उड्डाणपुल आणि अप ऍण्ड अबाऊ हॉटेल मधील जागेतून नव्याने पर्यायी रस्ता तयार करण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता तयार झाल्यावर पुल पाडण्यात येणार आहे.