पुणे : घोरपडे पेठेतील एका इमारतीतील सदनिकेत शुक्रवारी सायंकाळी आग लागली. अग्निशमन दलाच्या सदनिकेतील दहा मांजरांची सुटका जवानांनी शुक्रवारी सायंकाळी केली.
घोरपडे पेठेतील उर्दु शाळेजवळ शांतीनिवास सोसायटीत दुसऱ्या मजल्यावर सॅम्युएल मेरिडयन यांची सदनिका आहे. मेरिडयन यांचा फ्रीज, वातानुकुलन यंत्रणा दुरुस्तीचा व्यवसाय आहे. सदनिकेच्या शेजारी असलेल्या मोकळ्या जागेत जुनी वातानुकुलन यंत्रे तसेच अन्य साहित्य ठेवण्यात आले होते.
शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास मोकळ्या जागेत ठेवण्यात आलेल्या साहित्याला आग लागली. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. मेरिडयन, त्यांची पत्नी आणि मुलगा त्वरीत सदनिकेतून बाहेर पडले. सदनिकेत दहा पर्शियन मांजरी अडकल्याची माहिती जवानांनी दिली.
त्यानंतर जवान मंगेश मिळवणे, छगन मोरे सदनिकेत शिरले. सदनिकेत मोठ्या प्रमाणावर धूर झाला होता. मिळवणे, मोरे यांनी दहा मांजरांची आगीतून सुटका केली. दहा ते पंधरा मिनिटात आग आटोक्यात आली. शाॅर्ट सर्किटमुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. केंद्र प्रमुख प्रदीप खेडेकर, जवान मंगेश मिळवणे, छगन मोरे, प्रकाश शेलार, चंद्रकांत मेणसे, अक्षय केदारी यांनी आग आटोक्यात आणली.